Tilak Varma Retired out in LSG vs MI IPL 2025 Match: मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२५ मध्ये चार सामन्यांमध्ये तिसऱ्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे. लखनौविरूद्ध झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेरच्या षटकात १२ धावांनी सामना गमावला. या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. मुंबई संघाचा महत्त्वाचा फलंदाज असलेल्या तिलक वर्माला १९ल्या षटकात रिटायर्ड आऊट करावे लागले. त्यामुळे तो बाद न होता माघारी परतला.
आयपीएल २०२५ मध्ये तिलक वर्माची बॅट अजूनही शांत आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात तिलकला त्याच्या खराब फलंदाजीमुळे १९व्या षटकात रिटायर्ड आऊट होऊन परतावे लागले. यासह, आयपीएलमध्ये अशाप्रकारे बाद होणारा तो चौथा फलंदाज ठरला.
मुंबई इंडियन्सला नमन धीर आणि सूर्यकुमार यादवने संकटात बाहेर काढत डाव सावरला. पण नमन बाद झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या तिलकला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे सूर्यकुमार यादव चौकार-षटकार मारून मुंबईच्या धावसंख्येला गती देत होता, तर दुसरीकडे तिलक वर्मा प्रत्येकी एक धाव काढण्यासाठी मोठे प्रयत्न करताना दिसला. त्याला मोठे फटके खेळण्यासाठी खूप झुंज द्यावी लागत होती. त्याच्या बॅटने चौकार मारणे थांबवले आणि मोठ्या फटक्यांसाठी तो खराबपणे झुंजताना दिसला.
तिलक वर्मा रिटायर्ड आऊट
१७व्या षटकात सूर्यकुमार यादव बाद झाला तेव्हा तिलक वर्मा १८ चेंडूत केवळ १७ धावा करू शकला. त्यावेळी मुंबईला ५२ धावांची गरज होती. हार्दिक पंड्यानेही तो येताच चौकार साधला पण तिलकला मोठा फटका खेळण्यात यश मिळू शकले नाही. मुंबईला शेवटच्या २ षटकांत २९ धावांची गरज होती, परंतु या षटकातही तिलक वर्माला एकही चौकार लगावता आला नाही, तेव्हा संघाने पाचव्या चेंडूनंतर त्याला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. तिलक २३ चेंडूत केवळ २५ धावा करून रिटायर्ड आऊट झाला.
हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर तिलक वर्माला रिटायर्ड आऊट केल्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा हार्दिक म्हणाला, “तिलकला रिटायर्ड आऊट करणं एक साधारण गोष्ट होती. संघाला अखेरच्या षटकांमध्ये मोठ्या फटक्यांची गरज होती. क्रिकेटमध्ये असे दिवस कधी कधी येतात. तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, पण ते फटके बसत नव्हते.”
रिटायर्ड आऊट म्हणजे नेमकं काय?
रिटायर्ड आऊट हा डावपेचाचा एक भाग आहे. सामना जिंकायचा असेल तर योग्य फलंदाजाला मैदानात उतरवण्यासाठी रिटायर्ड आऊटचा उपयोग केला जातो. रिटायर्ड आऊटच्या माध्यमातून फलंदाज तंबुत परतला तर त्याला परत फलंदाजी करता येत नाही. क्रिकेटच्या नियमानुसार एखादा फलंदाज पंचाच्या आणि विरोधी संघाच्या कर्णधाराच्या परवानगीशिवाय तंबूत परतला तर त्याला रिटायर्ड बाद ठरवले जाते. तर दुसरीकडे रिटायर्ड हर्टमध्ये फलंदाज पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात उतरु शकतो.
अश्विन रिटायर्ड आऊट होणारा पहिला खेळाडू
आयपीएल २०२२ मध्ये लखनौविरोधातील सामन्यात राजस्थानची ६७ धावांवर चार बळी अशी दयनीय स्थिती झाली होती. अशा बिकट परिस्थितीत अश्विन मैदानात फलंदाजीसाठी उतरला. त्याने आपल्या खेळीमध्ये २३ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. त्यानंतर पुढच्या विकेटसाठी फलंदाजीसाठी येणारा रियान पराग अश्विनपेक्षा जास्त आक्रमक पद्धतीने खेळू शकेल असा विचार संघाने केला. याच कारणामुळे १९ व्या षटकात अश्विन रिटायर्ड आऊट म्हणून तंबूत परतला.