आयपीएल २०२३ मध्ये हरप्रीत भाटिया पंजाब किंग्जकडून खेळत आहे. मुंबई इंडियन्सविरोधात नुकत्याच झालेल्या सामन्यात भाटियाने सॅम करनसोबत पाचव्या विकेटसाठी ५० चेंडूत ९२ धावांची भागिदारी केली होती. या धावांच्या जोरावर पंजाब किंग्जने २० षटकात ८ विकेट्स गमावत २१४ धावा केल्या होत्या. ज्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी मुंबईचे ६ विकेट्स घेत २०१ धावांवर रोखलं. सॅम करन आणि अर्शदीप सिंग सामन्याचे हिरो ठरले. परंतु, भाटियाने २८ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. भाटियाच्या या इनिंगवरही चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
हरप्रीत सिंगने अशा प्रकारची खेळी करत स्वत:ला सिद्ध केलं. परंतु, यासाठी त्याला ११ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. यामागे असं कारण आहे, ज्यामुळं सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसेल. हरप्रीत सिंगने आयपीएल २०११ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
चूकीचं नाव छापल्याने करिअर संपलं होतं?
हरप्रीत सिंगसोबत अशी एक घटना घडली होती, ज्यामुळं त्याचं करिअर जवळपास संपुष्टात आलं होतं. २०१७ मध्ये आणखी एक क्रिकेटर हरमीत सिंगला पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केलं होतं. पण एका न्यूज एजन्सीने या घटेनचा रिपोर्ट दिला आणि नाव जाहीर करण्यात चूक केली. हरप्रीत २०१७ च्या आयपीएल लिलावाची प्रतीक्षा करत असताना ही घटना घडली. यावर्षी सय्यद मुश्ताक ट्रॉफीत हरप्रीतने जबरदस्त फलंदाजी केली होती आणि सर्वात जास्त धावा करण्याची नोंद त्याच्या नावावर झाली होती. पण नाव चुकीचं छापल्याने त्याचं नाव आयपीएल लिलावातून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर एजन्सीने या प्रकाराबाबत माफी मागितली होती. हरमीत सिंगही आयपीएल खेळला होता. ज्यामुळे हा सर्वा गोंधळ झाला होता. पण हरप्रीतला आयपीएल लिलावाला मुकावं लागलं होतं.