लिलावात संघाने खरेदी केल्यानंतर माघार घेतल्यामुळे दोन वर्षांच्या बंदीच्या कारवाईला सामोरं जाणारा हॅरी ब्रूक आता इंग्लंडचा कर्णधार असणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ब्रूकची वनडे आणि टी२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीची घोषणा केली.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंडच्या संघाला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर कर्णधार जोस बटलरने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
२६वर्षीय ब्रुक गेले वर्षभर वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत बटलरच्या अनुपस्थितीत त्याने संघाचं नेतृत्वही केलं होतं. आता त्याची कर्णधारपदी औपचारिक निवड झाली आहे. मे महिन्यात इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. ब्रुकसाठी पूर्णवेळ कर्णधार म्हणून ही पहिली मालिका असेल.
‘इंग्लंडचा कर्णधार म्हणून नियुक्ती होणं हा अतिशय सन्मानाचा क्षण आहे. या जबाबदारीला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल’, असं ब्रूकने म्हटलं आहे. २०२२ मध्ये ब्रुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टेस्ट, वनडे तसंच टी२० अशा तिन्ही प्रकारात त्याने आपल्या बॅटची ताकद दाखवली. ब्रुकने २४ टेस्ट, २६ वनडे आणि ४४ टी२० सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून नऊ इनिंग्जमध्ये ब्रुकने ८०९ धावा केल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये हा नवा विक्रम आहे.
आयपीएल स्पर्धेत २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादने ब्रुकला १३.२५ कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं. १४ एप्रिल रोजी ब्रुकने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना शतकी खेळी साकारली. एका हंगामानंतर हैदराबादने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने ६.२५ कोटी रुपये देऊन ब्रुकला संघात घेतलं. दिल्ली संघाची नव्याने बांधणी होत होती. ब्रूक दिल्लीचा कर्णधार असेल अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वसाधारण कामगिरीनंतर जोस बटलरने कर्णधारपद सोडलं. टेस्टचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे वनडे आणि टी२० खेळू शकेल का याविषयी साशंकता होती. माजी कर्णधार जो रूटने कर्णधारपदात स्वारस्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यामुळे ब्रूकचीच इंग्लंडच्या कर्णधारपदी निवड होईल हे दिसत होतं. सोमवारी यासंदर्भात औपचारिक घोषणा झाली.
दरम्यान लिलावात संघाने विकत घेतल्यानंतर माघार घेतल्यामुळे ब्रूकवर आयपीएल स्पर्धेत दोन वर्ष न खेळण्याची बंदी ठोठावण्यात आली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलसने यासंदर्भात नियम यंदाच्या हंगामापासून लागू केला. खेळाडूंना लिलावात घेतलं जातं मात्र ते आयत्यावेळी माघार घेतात. यामुळे संघांचं नुकसान होतं. त्याच क्षमतेचा पर्यायी खेळाडू मिळणंही कठीण होतं.