Virender Sehwag Criticizes Ashwin : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने यंदाच्या आयपीएलमध्ये फॉर्मात नसलेला अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनवर निशाणा साधला आहे. अश्विन या मोसमात विकेट घेण्यासाठी संघर्ष करत आहे आणि त्याने आठ सामन्यांत दोन विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने प्रति षटकात नऊ धावा दिल्या आहेत. फॉर्ममध्ये नसतानाही अश्विनने टी-२० मध्ये विकेट घेणे अप्रासंगिक असल्याचे म्हटले होते. अश्विनला प्रत्युत्तर देताना सेहवाग म्हणाला की, कदाचित अश्विनला पुढील हंगामाच्या आयपीएल लिलावात कोणीही खरेदीदार सापडणार नाही.
गोलंदाजाचे काम केवळ डॉट बॉल टाकणे नव्हे तर विकेट घेणे आहे –
वीरेंद्र सेहवागने टी-२० क्रिकेटमधील अश्विनच्या गोलंदाजीवर टीका केली. सेहवाग अश्विनशी असहमत आहे की गोलंदाजाचे लक्ष विकेट घेण्यावर नसून धावांचा वेग रोखण्यावर असते. सेहवाग म्हणाला, हे केएल राहुलच्या विधानासारखेच आहे. ज्यात त्याने म्हटले होते की स्ट्राइक रेटने काही फरक पडत नाही. क्रिकबझवर बोलताना सेहवाग म्हणाला की, गोलंदाजाचे काम केवळ डॉट बॉल टाकणे नव्हे तर विकेट घेणे आहे. वीरू म्हणाला, “जेव्हा असे घडते, जेव्हा तुम्ही तुमचे षटक ६-७ धावांचे टाकता, तेव्हा हा सेट फलंदाज इतर गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करतो. कारण तो तुमच्यासारखा हुशार नाहीत. त्यामुळे तुमच्यासारखा वाचू शकत नाही. त्यामुळे फलंदाज अधिक धावा करण्यासाठी सज्ज असेल. त्यामुळे, गोलंदाजी फक्त डॉट बॉलसाठी न करता विकेट घेण्यासाठी करणे चांगले. हे माझे मत आहे.”
वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला, “तुमच्याकडे खूप अनुभव आहे, त्यामुळे तुम्हाला विकेट घेण्याकडे लक्ष द्यावे लागेल, मोठ्या शॉटपासून वाचण्यासाठी नाही. म्हणून पुढच्या हंगामातील लिलावात त्याला कोणी खरेदी करेल, असे मला वाटत नाही. कारण जेव्हा तुम्ही गोलंदाजाला खरेदी करता, तेव्हा तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करता की तो २०-२५ धावा रोखू शकेल किंवा तुम्हाला विकेट मिळवून देऊ शकेल.”
वीरेद्र सेहवागने अश्विनच्या मानसिकतेवर टीका –
त्याबरोबर वीरेद्र सेहवागने अश्विनच्या मानसिकतेवर टीका केली. सेहवाग म्हणाला, त्याचे सहकारी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव नियमित अंतराने विकेट घेत आहेत. सेहवाग म्हणाला, “अश्विनचे सर्व प्रतिस्पर्धी, चहल, कुलदीप किंवा इतर कोणीही खेळाडू विकेट घेत आहेत. अश्विनला वाटते की त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी केली, तर कोणताही फलंदाज त्याच्याविरुद्ध फटकेबाजी करेल. म्हणून अश्विन कॅरम बॉल टाकतो आणि यामुळे त्याला विकेट मिळत नाहीत.”
माजी खेळाडू पुढे म्हणाला, “जर अश्विनने त्याच्या ऑफ स्पिनवर किंवा फलंदाजावर विश्वास ठेवला, तर कदाचित त्याला विकेट मिळू शकेल, पण ती त्याची मानसिकता आहे. जर मी फ्रेंचायझीचा प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक असतो, तर मी असा विचार करणार नाही. माझ्या गोलंदाजाने विकेट घेण्याऐवजी धावा वाचवण्याचा विचार केला असता तर मी त्याचा संघात समावेश केला नसता.”