Heinrich Klaasen reacts to no ball controversy: आयपीएल २०२३ मधील ५८ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स संघात खेळला गेला. या सामन्यात लखनऊने हैदराबादचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. त्यामुळे आता लखनऊचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान या सामन्यात नो बॉलवरुन बराच वाद पाहायला मिळाला. ज्यावर हैदराबदचा फलंदाज हेनरिक क्लासेनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला अंपायरिंग अत्यंत खराब होती. त्याचबरोबर भारतीय प्रेक्षकांचे वर्तन असभ्य असल्याचे म्हणाला.
सामन्यानंतर क्लासेनने सांगितले की, “सामन्याच्या मध्यावर विकेट झपाट्याने बदलली. त्यात फिरकी तसेच उसळी होती आणि क्रुणाल पांड्याने मार्कराम आणि फिलिप्सला बाद करून आम्हाला अडचणीत आणले. येथे हार्ड लेंथ बॉल खेळणे कठीण जात होते. ही विकेट खराब नसली तरी खूपच संथ होती.” तो पुढे म्हणाला की, खरे सांगायचे तर प्रेक्षकांनी माझी खूप निराशा केली आहे, हे असे काहीतरी आहे जे तुम्हाला नको असते. अंपायरिंगही चांगले नव्हते आणि त्यामुळे गती खंडित झाली.”
आवेश खानच्या नो बॉलचे प्रकरण –
वास्तविक पहिल्या डावाचे १९ षटक टाकण्यासाठी आवेश खान आला होता. आवेश खानने अब्दुल समदला टाकलेला तिसरा चेंडू कंबरेच्या वरच होता. त्यामुळे मैदानी पंचांनी हा नो बॉल घोषित केला. त्यानंतर लखनऊने या चेंडूबाबत रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी तो चेंडू वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर समद नाराज दिसला. या निर्णयावर प्रेक्षकही नाराज दिसले. दरम्यान काही प्रेक्षकांनी लखनऊ सुपरजायंट्सच्या डगआऊटच्या दिशेने नट आणि बोल्ट फेकले.
हेही वाचा – SRH vs LSG: हैदराबाद-लखनऊ सामन्यात ‘नो बॉल’वरून वाद; टॉम मूडी यांनी पंचांच्या निर्णयावर उपस्थित केला प्रश्न
त्यानंतर पंचांनी डग आऊटजवळ जाऊन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही पोलीस तेथे पोहोचले. त्यादरम्यान लखनऊचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनीही मैदानी पंचांशी संवाद साधला. त्यानंतर हा वाद मिटला. सामन्याबदल बोलायचे, तर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १८२ धावा केल्या. यामध्ये हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात लखनऊने प्रेरक मंकडच्या नाबाद ६४ धावांच्या जोरावर, १९.३ षटकांत ३ गडी गमावून १८५ धावा केल्या.