SRH vs LSG Heinrich Klassen Run Out IPL 2025: विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला लखनौ संघाने त्यांच्या शैलीत फलंदाजी करत पराभवाचा धक्का दिला. हैदराबादचे फलंदाज आणि गोलंदाजही या सामन्यात फेल ठरले. दरम्यान हेनरिक क्लासेनच्या रनआऊटनेही सर्वांचं लक्ष वेधलं. संघाला ४ विकेट्स गमावल्यानंतर चांगल्या धावसंख्येची गरज असताना क्लासेन वाईटरित्या धावबाद झाला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही हैदराबादचे फलंदाज मोठी खेळी करतील यावर सर्वांच्या नजरा होत्या पण यावेळी सर्वच फलंदाज फेल ठरले. यावेळी अभिषेक शर्मा आणि ईशान किशन स्वस्तात माघारी परतले. तर ट्रॅव्हिस हेडने २८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. यानंतर मोठी धावसंख्या गाठण्याची जबाबदारी हेन्रिक क्लासेनवर आली, मात्र तो दुर्दैवाचा बळी ठरला. क्लासेन दुर्देवीरित्या धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
हेडला क्लीन बोल्ड करणाऱ्या प्रिन्स यादवकडे १२ वे षटक टाकण्याची जबाबदारी होती. १२व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर, लखनौचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने ऑफ स्टंपच्या बाहेर एक लो फुल-टॉस चेंडू टाकला. यावर नितीश रेड्डीने समोरच्या दिशेने जोरदार फटका खेळला चेंडू प्रिन्सच्या दिशेने गेला. फटका इतका वेगवान होता की प्रिन्सने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हाताला लागून चेंडू जाऊन थेट स्टंपवर आदळला.
प्रिन्स यादवच्या हाताला लागून चेंडू स्टंपवर आदळला तेव्हा क्लासेन धावण्यासाठी क्रीजबाहेर उभा होता आणि तो धावबाद झाला. अशाप्रकारे, ज्या चेंडूवर रेड्डी झेलबाद होणार होता, त्या चेंडूवर क्लासेन दुर्दैवाने त्याची विकेट गमावली. क्लासेनच्या संघातील खेळाडूच्या फटक्यामुळेच तो धावबाद झाला.
नितीश कुमार रेड्डीने एवढा जोरदार फटका खेळला होता की ती वेगाने चेंडू प्रिन्स यादवच्या दिशेने आला. त्यामुळे हाताला चेंडू लागला तरी तो पकडू शकला नाही पण त्याला दुखापत झाली. प्रिन्स चांगलाच वेदनेने कळवळताना दिसला. क्लासेन बाद झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा डाव रुळावरून घसरला. नितीश रेड्डीही २ षटकं खेळून बाद झाला. त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. शेवटी हैदराबाद संघाने झटपट विकेट गमावल्या. परिणामी हैदराबादचा विस्फोटक फलंदाजी करणारा संघाचा डाव यावेळी केवळ १९० धावांवरच थांबला.