Yash Dayal’s video call to his mother after the win : आपल्या मुलाची वेदना फक्त आईच समजू शकते आणि बरोबर ४०५ दिवसांपूर्वी, रिंकू सिंगने एका षटकात पाच षटकार मारल्यानंतर यश दयालची कारकीर्द विस्कळीत होत असल्याचे पाहून त्याची आई राधा दयाल आजारी पडली होती. पण आता एका षटकाने सगळंच बदलून टाकलं. रिंकूच्या बॅटमधून निघालेली ही आतषबाजीही दयालच्या कारकिर्दीचा मार्ग बंद करणारी ठरली असती. पण ज्यांना सोशल मीडियाच्या निर्दयी प्रवाहाने प्रभावित केले नाही, अशा यश दयालच्या आईला आपला मुलगा पुनरागमन करेल, असा विश्वास होता. तो विश्वासही यश दयालने खरा करुन दाखवला. त्याने आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर पहिला व्हिडीओ कॉल आईला केला.
आयपीएलमधील महान फिनिशर महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यासमोर यश दयालने एका षटकात १७ धावा होऊ दिल्या नाहीत. दयालने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल प्लेऑफमध्ये नेणारे करिष्माईक २० वे षटक टाकून स्वतःची आणि त्याच्या आईची प्रत्येक जखम भरून काढली. यश दयालच्या या शानदार कामगिरीनंतर रिंकू सिंगनेही त्याचे कौतुक केले. रिंकू सिंगनेही इन्स्टाग्रामवर स्टोरीवर यश दयालचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले की, ‘ही देवाची इच्छा होती.’
यश दयालने आईला केला पहिला व्हिडीओ कॉल –
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जिंकून दिल्यानंतर यश दयालने पहिला व्हिडीओ कॉल आईला केला. दयालने आपल्या आईला व्हिडिओ कॉल करून विचारले की, ‘आता तुला कसं वाटतयं आई?’ त्याचे वडील चंद्रपाल म्हणाले की, त्याच्या मुलाने आपल्या आईला सांगितले होते की, तो एमएस धोनीला विजयी धावा करू देणार नाही. यशचे वडील क्लब स्तरावर क्रिकेट खेळले आहेत. ते २०१९ मध्ये प्रयागराजमधील महालेखापाल कार्यालयातून निवृत्त झाले आहेत.
हेही वाचा – SRH vs PBKS : अभिषेक शर्माने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
९ एप्रिल (२०२३) रोजी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर रिंकू सिंगच्या पाच षटकारांचा सामना करणाऱ्या आपल्या मुलासोबत ते पर्वताप्रमाणे उभा राहिले. जुन्या आठवणींना उजाळा देताना त्याचे वडील म्हणाले, ‘पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार ठोकला, तेव्हा ते भयावह स्वप्न पुन्हा येत होते. पण यावेळी काहीतरी चांगलं घडेल असं मला आतून वाटत होतं. त्याच्या मेहनतीचे हे फळ आहे. देवाची त्याच्यावर कृपा राहिली.’ गेल्या वर्षी गुजरात टायटन्सने दयालला सोडले पण आरसीबीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या संघात सामील करुन घेतले.
हेही वाचा – SRH vs PBKS : हैदराबादचा ४ विकेट्सनी दणदणीत विजय, पंजाबच्या पराभवाने राजस्थानची वाढली डोकेदुखी
गेल्या आयपीएलनंतर यश दयाल आजारी पडला होता. पण त्याचे वडील त्याचे प्रेरणास्थान बनले. ते म्हणाले, ‘मी त्याला स्टुअर्ट ब्रॉडचे उदाहरण द्यायचो. त्याला सांगायचो २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने एका षटकात सहा षटकार मारले असतानाही स्टुअर्ट ब्रॉड इतका महान गोलंदाज कसा बनला. तो मानसिकदृष्ट्या मजबूत राहावा आणि त्याला नैराश्याचा त्रास होऊ नये यासाठी मी प्रयत्न केला.’ त्याच्या पुनरागमनासाठी तंदुरुस्ती आणि मानसिक बळ मिळविण्याच्या प्रयत्नात दयालने मिठाई, आईस्क्रीम आणि अगदी मटण कीमा खाणे सोडले होते.