आयपील २०२५ हंगामापूर्वी गव्हर्निंग काऊंसिलने नियमांसंदर्भात पत्रक जारी केलं. या पत्रकातला एक मुद्दा मुंबई इंडियन्सच्या रविवारच्या विजयात निर्णायक ठरला. दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करणारा संघ चेंडू बदलाची मागणी करू शकतो. पंचांनी ती मागणी ग्राह्य वाटली तर ते नवा चेंडू देऊ शकतात. रविवारी दिल्लीविरुद्धच्या लढतीत, करुण नायरच्या अफलातून खेळीमुळे विजयाचं पारडं दिल्लीच्या दिशेने झुकलं होतं. मैदानात दव पडू लागलं होतं. यामुळे नवा चेंडू घेण्यासंदर्भात मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये चर्चा झाली. १३व्या षटकानंतर चेंडू बदलण्यात आला. नवा चेंडू ग्रिप चांगल्या पद्धतीने होतो. अनुभवी कर्ण शर्माने नव्या चेंडूचा फायदा उठवत तीन विकेट्स पटकावल्या आणि मुंबईला थरारक विजय मिळवून दिला.

१३व्या षटकानंतर चेंडू बदलण्यात आला. तोपर्यंत कर्ण शर्माने एक षटक टाकलं होतं. नव्या चेंडूने गोलंदाजी करताना कर्णने ट्रिस्टन स्टब्जला तंबूत परतावलं. त्याच्या पुढच्या षटकात अनुभवी राहुलला बाद करत कर्णने सामन्याचं पारडं मुंबईच्या दिशेने झुकवलं. कर्णने त्याआधी अभिषेक पोरेलला बाद केलं होतं. कर्णने ४ षटकात ३ विकेट्स पटकावत मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून कर्ण शर्माचा समावेश करण्यात आला होता.

नेमका नियम काय?

दुसऱ्या डावात दवामुळे किंवा चेंडूचा आकार बदलला असेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार पंचांकडे नव्या चेंडूसाठी विनंती करू शकतो. पंचांना त्यांची विनंती योग्य वाटली तर ते नवा चेंडू घेऊ शकतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची विनंती मान्य करणं पंचांना बंधनकारक नाही. ही विनंती क्षेत्ररक्षण करणारा संघ १०व्या षटकानंतरच करू शकतो. क्षेत्ररक्षण करणारा संघ नव्या चेंडूसाठी विनंती करू शकतो पण चेंडू निवडण्याचा अधिकार पंचांकडेच आहे.

१०व्या षटकापूर्वी चेंडू बदलण्याचा अधिकार पंचांकडे आहे. कोणत्याही कारणास्तव चेंडू योग्य स्थितीत नाही असं पंचांच्या लक्षात आलं तर ते तातडीने चेंडू बदलू शकतात. दवामुळे चेंडू ओलसर झाला किंवा चेंडूचा आकार बदलला किंवा चेंडू हरवला तर नवा चेंडू घेतला जाऊ शकतो. पंच स्वत:हूनच यासंदर्भात निर्णय घेतात. आयपीएल २०२५ नव्या हंगामापासून दुसऱ्या डावात १०व्या षटकानंतर नव्या चेंडूसाठी विनंती करण्याचा अधिकार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला देण्यात आला आहे. मात्र नव्या चेंडूसाठी विनंती एकदाच करता येऊ शकते. ही विनंती षटक संपल्यानंतर करता येते. षटकादरम्यान नवा चेंडू घेतला जाऊ शकत नाही. आधीच्या चेंडूप्रमाणेच स्वरुप असलेला नवा चेंडू घेतला जातो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या विनंतीव्यतिरिक्त पंच त्यांना योग्य वाटेल तेव्हा चेंडू बदलू शकतात.

कोरोना काळात संसर्गाचा धोका असल्यामुळे चेंडू स्विंग करण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. आयपीएलच्या या हंगामाकरता लाळेच्या वापराची अनुमती देण्यात आली आहे. मात्र हा नियम फक्त आयपीलपुरताच मर्यादित आहे. आयसीसीने अद्यापही चेंडूवर लाळेच्या वापराला परवानगी दिलेली नाही. अन्य नियमांमध्ये नोबॉल आणि वाईड ठरवण्यासाठी डीआरएसचा वापर केला जाऊ शकतो. हॉकआय आणि बॉल ट्रॅकिंग प्रणालीद्वारे पंच यासंदर्भात अचूक निर्णय घेऊ शकतात.