How Will CSK Qualify to IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये सर्व संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. या हंगामात आरसीबी, गुजरात, दिल्ली, मुंबई आणि पंजाब सारखे संघ उत्तम फॉर्ममध्ये आहेत. तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची यंदा स्पर्धेत मात्र अवस्था वाईट आहे. चेन्नईचा नववा सामना गुणतालिकेत तळाशी असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. आता जर चेन्नई हैदराबादविरुद्ध हरली तर संघ आयपीएल २०२५ मधून बाहेर पडणार का? जाणून घेऊया काय आहे समीकरण
आयपीएल २०२५ मध्ये, चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव करून शानदार सुरुवात केली. पण यानंतर संघाची गाडी रूळावरून घसरली आणि सलग ५ सामने गमावले. ८ सामन्यांनंतर परिस्थिती अशी आहे की सीएसके गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. इथून संघाला प्लेऑफसाठी पात्र ठरणं खूप मोठं काम असणार आहे, पण अशक्य नसेल.
आज आयपीएल २०२५ च्या ४३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येणार आहेत. हैदराबाद गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांची हंगामात आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दोन्ही संघांचे आठ सामन्यांतून चार गुण आहेत आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील.
चेन्नई सुपर किंग्ज ८ सामन्यांत फक्त दोन विजयांसह व -१.३९२ या नेट रन रेटसह गुणतालिकेत तळाशी आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी, धोनीच्या सीएसकेला कोणत्याही परिस्थितीत उर्वरित सर्व ६ सामने जिंकावे लागतील. फक्त विजय नाही तर हे सामने संघाला मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, जेणेकरून त्यांचा नेट रन रेट सुधारेल.
चेन्नई हैदराबादविरूद्ध पराभूत झाल्यास स्पर्धेतून होणार बाहेर?
जर चेन्नईला हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला तर तो संघासाठी मोठा धक्का असेल. कारण उर्वरित ५ सामने संघाला जिंकावे लागतीलच पण इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. जर गुणतालिकेत टॉप-५ मधील संघांना जर पराभव पत्करावा लागला तर शेवटचे ५ सामने जिंकणे सीएसकेसाठी पुरेसे असू शकते. जर चेन्नईने अखेरचे ५ सामने जिंकले तर त्यांचे १४ गुण होतील आणि प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहतील.
जीटी, आरसीबी आणि डीसी संघाने आधीच १२-१२ गुणांचा टप्पा गाठला आहे. त्यांना पात्रता फेरीसाठी फक्त दोन विजयांची आवश्यकता आहे. दरम्यान, मुंबई, लखनौ आणि पंजाब यांचे १० गुण आहेत, ज्यामुळे सीएसकेला प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळजवळ अशक्य होईल. त्यामुळे चेन्नईला प्लेऑफसाठी उर्वरित ६ सामने जिंकणं महत्त्वाचं असणार आहे.