I asked him what’s next and Rohit Sharma said the world cup : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि सध्याचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्यात त्याच्या भविष्याबाबत चर्चा झाली. लखनऊ सुपरजायंट्स विरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सच्या १८ धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर मार्क बाउचरने रोहितला विचारले पुढे काय करणार आहेस? यावर रोहित शर्माने फक्त एका शब्दात उत्तर दिले. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या मोसमात गुणतालिकेत तळाशी राहिला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी गेल्या दोन महिन्यांत संघाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याबद्दल खुलेपणाने सांगितले.
यंदाचा हंगाम मुंबईसाठी खूपच खराब होता, त्यामुळे मार्क बाउचरला विचारण्यात आले की माजी कर्णधार रोहित शर्मा पुढेही संघासोबत राहणार आहे का? यावर मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, “रोहित स्वतः आपल्या भविष्याचा निर्णय घेईल.” रोहितने हंगामातील शेवटच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. आयपीएल २०२४ मध्ये त्याची सुरुवात चांगली झाली होती, पण नंतर त्याची कामगिरी खालावली. बाउचर पत्रकार परिषदेत म्हणाला, “मला वाटते की तो स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम आहे. पुढच्या हंगामापूर्वी एक मोठा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये काय होईल कोणास ठाऊक?”
रोहित शर्माने दिले एका शब्दात उत्तर –
शेवटच्या साखळी सामन्यानंतर जेव्हा बाउचरने रोहितशी चर्चा केली तेव्हा त्याचे उत्तरही खूप मजेदार होते. बाउचरने रोहितसोबतच्या चर्चेबद्दल सांगितले की, “मी रोहित शर्माशी बोललो. आम्ही या वर्षीच्या हंगामाचा आढावा घेतला. यानंतर मी त्याला विचारले पुढे काय? यावर रोहित म्हणाला वर्ल्डकप.” रोहितचे हे उत्तर ऐकल्यानंतर मार्क बाउचर पुढे काही बोलू शकला नाही. आयपीएल २०२४ मध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला मुंबईचा कर्णधार नियुक्त करण्यात आले होते. व्यवस्थापनाच्या या निर्णयात मार्क बाऊचरचाही महत्त्वाचा वाटा होता. मार्क बाउचरसोबत हार्दिकची मैत्रीही खूप पाहायला मिळाली. अशा स्थितीत हार्दिक आणि मार्क बाउचर दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असल्याचे मानले जात होते.
हेही वाचा – MI vs LSG : स्टॉइनिसला खुन्नस दाखवणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची निकोलस पूरनने केली धुलाई, VIDEO होतोय व्हायरल
रोहितने चालू हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या –
या हंगामात रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय असेल, पण तो आयपीएल २०२४ मध्ये त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. रोहितने १४ डावात ३२.०७ च्या सरासरीने ४२७ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. २०१६ मध्ये मुंबईसाठी रोहितचा सर्वात यशस्वी हंगाम होता. जेव्हा त्याने ४०० धावांचा टप्पा ओलांडला होता आणि आता आठ वर्षांनंतर त्याने पुन्हा ही कामगिरी केली.