Richard Kettleborough’s statement on Sanju : आयपीएलच्या १७व्या हंगामानंतर आयसीसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला जूनमध्ये सुरुवात होणार आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकात भारताचा १५ सदस्यीय संघ कसा असेल हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. आता माजी क्रिकेटपटूही विश्वचषकासाठी आपापल्या १५ सदस्यीय संघांची निवड करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय १ मे रोजी टीम इंडियाची घोषणा करू शकते. यावेळी टीम इंडियामध्ये अनेक तरुण नवे चेहरे दिसू शकतात आणि त्यामुळे काही दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट होऊ शकतो. अशात संजू सॅमसनला संधी देण्याबाबत मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान अंपायर रिचर्ड केटलबरोने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंपायरने निवडकर्त्यांना दिला इशारा!

दिग्गज अंपायर रिचर्ड केटलबरो यांनी आता संजू सॅमसनबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, “जर संजू सॅमसन आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ खेळला नाही, तर संजूपेक्षा हे भारताचे जास्त नुकसान होईल, असे वाटते.” याशिवाय सोशल मीडियावर माजी खेळाडू आणि चाहत्यांनीही संजूचा टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्याची मागणी सुरू केली आहे.

आयपीएल २०२४ मध्ये, २७ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. राजस्थानने हा सामना ७ विकेटनी जिंकला. यासह राजस्थान आयपीएल २०२४ मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने अप्रतिम खेळी केली. संजूने लखनऊविरुद्ध ३३ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या. यादरम्यान संजूने ७ चौकार आणि ४ शानदार षटकार मारले.

हेही वाचा – IPL 2024: राजस्थान रॉयल्सने १६ गुण मिळवूनही प्लेऑफचे तिकीट का मिळाले नाही? काय आहे नेमकं कारण

आयपीएल २०२४ मध्ये संजू सॅमसनची कामगिरी –

आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मोसमात राजस्थानचा संघ फक्त एकच सामना हरला आहे. ज्यामध्ये संजूची मोठी भूमिका आहे. या मोसमात आतापर्यंत संजूने ९ सामन्यात १६१ च्या स्ट्राईक रेटने ३८५ धावा केल्या आहेत. तो यंदाच्या हंगामात विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्यानंतर संजूची २०२४ टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड केली जावी, यासाठी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. मात्र, यावेळी यष्टिरक्षकांची निवड करणे निवडकर्त्यांसाठीही आव्हानात्मक असणार आहे. कारण संजू व्यतिरिक्त ऋषभ पंत आणि केएल राहुलही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If sanju samson doesnt play the icc t20 world cup 2024 feel itll be indias loss than sanjus says richard kettleborough vbm
Show comments