Sakshi Reveals About Dhoni’s Test Retirement : आयपीएल २०२४ मध्येही ४२ वर्षीय एमएस धोनीची बॅट आग ओकत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने १६ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३७ धावांची तुफानी खेळी केली. या वयातही धोनीचा अप्रतिम फिटनेस पाहायला मिळत आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवून सर्वांना आश्चर्यचकित केले. धोनीने असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला होता. आता त्याची पत्नी साक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने धोनीच्या कसोटीतून निवृत्त होण्याबद्दल खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याआधीही अनेक प्रसंगी त्यांनी कोणाला अपेक्षित नसताना अचानक मोठे निर्णय घेतले. मग ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती असो किंवा वनडे-टी-२० चे कर्णधारपद सोडणे असो किंवा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती असो. धोनीने अनेकवेळा अचानक घेतलेले निर्णय चकित केले आहेत. धोनीने २०१४ मध्ये अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर टीम ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर होती आणि माहीच्या या निर्णयाने चाहते आश्चर्यचकित झाले. मात्र, त्याच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे खरे कारण कोणालाच माहीत नव्हते. आता यामागचे कारण समोर आले आहे.

‘तुला मूल हवे असेल तर तुला किमान…’

साक्षीने पती धोनीने इतक्या लवकर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली याचा खुलासा केला आहे. चेपॉकमध्ये केकेआर विरुद्ध सीएसकेच्या आयपीएल सामन्यादरम्यान एका चाहत्याने एक जुनी क्लिप शेअर केली होती, ज्यामध्ये ती २०१४ मध्ये धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून अनपेक्षित निवृत्तीबद्दल बोलताना दिसली होती. या व्हिडीओमध्ये साक्षी म्हणते, “जेव्हा तो कसोटी क्रिकेट सोडत होता, तेव्हा आम्हाला तो निवृत्ती घेणार असल्याचे संकेत मिळाले होते. मलाही आठवतंय मी त्याला सांगितलं होतं की, ‘तुला मूल हवे असेल तर तुला किमान एका फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यावी लागेल. कारण तिन्ही फॉरमॅट खेळत राहिला, तर तुझ्याकडे मुलासोबत खेळायला किंवा मजा करायला तुला वेळ मिळणार नाही.”

हेही वाचा – SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे

‘त्याची जी प्राथमिकता आहे तिच माझी’

व्हिडीओमध्ये साक्षी असेही म्हणताना दिसत आहे की, “जिवाचा जन्म झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये सर्वजण सांगत होते की तुझा नवरा आला नाही. तेव्हा मी त्यांना सांगितले की, त्याची प्राथमिकता क्रिकेट आहे आणि माझी प्राथमिकता तो आहे. अशात त्याची जी प्राथमिकता आहे तिच माझी आहे.” यादरम्यान व्हिडीओमध्ये साक्षी घरातील वातावरणही दाखवताना दिसते.

साक्षीने विश्वचषक विजेत्या कर्णधाराशी लग्न केल्याच्या त्याग आणि आनंदाबद्दलही सांगितले. ती म्हणाली, “लोक मला म्हणतात की त्याची पत्नी म्हणून मला खूप त्याग करावा लागला. मी म्हणते की, ‘असं काही नाही, हे सर्व प्रेम आहे’. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा त्याला त्याग म्हणता येणार नाही.” साक्षीच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते की ती आणि धोनी एकमेकांचा खूप आदर करतात. याचा उल्लेख धोनीने स्वतः अनेकदा केला आहे.

हेही वाचा – फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात

सीएसकेने या हंगामाची सुरुवात शानदार शैलीत केली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स विरुद्धचे पहिले दोन्ही सामने जिंकल्यानंतर, सीएसकेने दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सलग दोन सामने गमावले आहेत. त्यानंतर केकेआरविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सीएसकेने तिसरा विजय मिळवला. आता सीएसकेचा पुढील सामना रविवारी १४ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you want a child you should step down sakshi dhoni reveals real reason behind msds early test retirement vbm