आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) गुरुवारी (७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध खेळताना आक्रामक खेळ करत शानदार अर्धशतक झळकावलं. पृथ्वी शॉची ही आक्रमक फलंदाजी पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने पृथ्वीचं तोंडभरून कौतुक केलं.

पृथ्वी शॉने ३४ चेंडूंमध्ये ६१ धावांची खेळी केली. मात्र, दिल्लीला इतकी चांगली सुरुवात होऊनही त्याचा फायदा घेता आला नाही. दिल्लीने २० षटकात ३ बाद केवळ १४९ धावा केल्या. १५० धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊकडून क्विंटन डी कॉकने तडाखेबाज ८० धावांची खेळी केली. यासह लखनऊने दोन चेंडू बाकी असतानाच १५५ धावा करत ६ विकेटने सामना जिंकला.

“असा स्फोटक सलामीवीर फलंदाज आहे ज्याची सर्वांना आवश्यकता आहे”

यानंतर पृथ्वी शॉच्या फलंदाजीवर बोलताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने पृथ्वी शॉचं कौतुक केलं. आकाश चोप्रा म्हणाला, “पृथ्वी शॉ अगदी पृथ्वी क्षेपणास्त्रासारखा खेळला. मी म्हटलं होतं की हा दिवस पृथ्वी शॉचा ठरू शकतो. शॉने काय अप्रतिम फलंदाजी केलीय. तो जेव्हा अशी फलंदाजी करतो तेव्हा वाटतं की तो असा स्फोटक सलामीवीर फलंदाज आहे ज्याची सर्वांना आवश्यकता आहे.”

“लखनऊच्या गोलंदाजांना पृथ्वीला रोखता आलं नाही”

“लखनऊ सुपर जायंट्सचे गोलंदाज पृथ्वी शॉला रोखण्यात यशस्वी झाले नाही. लखनऊची गोलंदाजी सर्वश्रेष्ठ नसली तरी खराबही नव्हती. लखनऊने ठीक गोलंदाजी करूनही पृथ्वीला रोखता आलं नाही. कृष्णप्पा गौतमला गोलंदाजी दिल्यावर त्याने अवेश खान आणि रवि बिश्नोई दोघांना बाद केलं. केएल राहुलने सर्व काही करण्याचा प्रयत्न केला मात्र, पृथ्वीला कोणालाही रोखता आलं नाही.”

हेही वाचा : …अन् त्याने मला १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवलं; चहलने सांगितला ‘थोडक्यात जीव वाचला’वाला किस्सा

पृथ्वीने ९ चौकार आणि २ षटकार लगावत ६१ धावांची खेळी केली. शॉने डेविड वॉर्नरसोबत पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. यात वॉर्नरचं योगदान केवळ ४ धावांचं होतं.

Story img Loader