Yash Dayal Update Hardik Pandya IPL 2023: ९ एप्रिलची संध्याकाळ गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या मनातून निघण्याचे नाव घेत नाही. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयालने ९ एप्रिल रोजी कोलकाता विरुद्ध गुजरात सामन्यात ५ चेंडूत सलग ५ षटकार ठोकले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रिंकू सिंगच्या बॅटमधून बाहेर पडलेले ते पाच षटकार अजूनही यश दयालला झोपू देत नाहीत. मैदानावरील त्या घटनेनंतर यशची प्रकृती बिघडली असून त्या पाच षटकारांनी यशला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामन्यापासून यश दयाल गुजरातच्या प्लेइंग-११ मधून बाहेर आहे. मुंबईविरुद्धच्या दमदार विजयानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने यशच्या तब्येतीबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
यश दयाल याची प्रकृती खालावली
केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगने सलग पाच षटकार मारल्यानंतर यश दयाल दहा दिवसांपासून आजारी असल्याचे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले. तो म्हणाला, “कोलकाताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर यश दयाल १० दिवस आजारी होता. त्याचे ८ ते १० किलो वजन कमी झाले आहे. मात्र, तो स्वत:वर मेहनत घेत आहे आणि लवकरच मैदानात परतणार आहे.”
रिंकूने पाच षटकार मारले
गुजरात टायटन्स आणि केकेआर यांच्यात झालेल्या सामन्यात रिंकूने अखेरच्या षटकात यश दयालला सलग पाच षटकार ठोकले. कोलकाताला शेवटच्या षटकात विजयासाठी २९ धावांची गरज होती आणि रिंकूच्या पाच षटकारांमुळे केकेआरने संस्मरणीय विजय नोंदवला. यश दयालच्या गोलंदाजीवर केकेआरच्या फलंदाजांनी तूफान फटकेबाजी केली. यशने चार षटकांत ६९ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
यशची आयपीएल कारकीर्द काही खास राहिलेली नाही
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयालची आयपीएल कारकीर्द आतापर्यंत काही खास राहिलेली नाही. या वेगवान गोलंदाजाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत एकूण १२ सामने खेळले असून यादरम्यान त्याने ११ विकेट्स घेतल्या आहेत. यशने या लीगमध्ये १०.२९ इकॉनॉमीसह धावा दिल्या आहेत.