कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये बुधवारी ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान असेल. या सामन्यात बंगळूरुचा तारांकित फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.
कार्तिक, फॅफकडून अपेक्षा
बंगळूरुचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीला यंदा धावांसाठी झगडावे लागले. मात्र, गेल्या सामन्यात गुजरातविरुद्ध त्याने निर्णायक क्षणी ७३ धावांची खेळी केली. आता तो लखनऊविरुद्धही मोठी खेळी करेल अशी बंगळूरुला आशा आहे. तसेच फलंदाजीत कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिस आणि दिनेश कार्तिक यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. ग्लेन मॅक्सवेलचे अष्टपैलू योगदान महत्त्वाचे ठरेल. बंगळूरुच्या गोलंदाजीची मदार जोश हेझलवूड, हर्षल पटेल आणि लेग-स्पिनर वानिंदू हसरंगा या त्रिकुटावर आहे.
राहुल, डीकॉकवर भिस्त
लखनऊच्या यंदाच्या हंगामातील यशात कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डीकॉक या सलामीवीरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी गेल्या सामन्यात कोलकाताविरुद्ध २१० धावांची अभेद्य भागीदारी करताना विक्रम रचला होता. आता बंगळूरुविरुद्ध त्यांनी पुन्हा चांगला खेळ करणे गरजेचे आहे. त्यांना दीपक हुडाची उत्तम साथ लाभली आहे. परंतु, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंडय़ा आणि आयुष बदोनी यांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. गोलंदाजीत जेसन होल्डर, आवेश खान, मोहसीन खान आणि रवी बिश्नोई यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित आहे.
- वेळ : सायं. ७.३० वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी, सिलेक्ट १