मुंबई : सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट हंगामातील आपल्या अखेरच्या लढतीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. हैदराबादचा संघ कर्णधार केन विल्यम्सनशिवाय खेळणार आहे. कारण दुसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी तो न्यूझीलंडमध्ये परतला आहे. त्याच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार किंवा निकोलस पूरनकडे संघाचे नेतृत्व सोपवले जाईल. याआधीच्या सामन्यात हैदराबादने मुंबई इंडियन्सवर तीन धावांनी निसटता विजय मिळवला, तर पंजाबने दिल्ली कॅपिटल्सकडून १७ धावांनी पराभव पत्करला.
शिखर धवन (४२१ धावा), लियाम लििव्हगस्टोन (३८८ धावा), जॉनी बेअरस्टो (२३० धावा) यांच्यावर पंजाबच्या फलंदाजीची भिस्त आहे. याचप्रमाणे कॅगिसो रबाडाने सर्वाधिक २२ बळी मिळवले आहेत, तर राहुल चहर (१४ बळी) आणि अर्शदीप सिंग यांनीही मोलाचे योगदान दिले आहे.
राहुल त्रिपाठी (३९३ धावा), अभिषेक शर्मा (३८३ धावा), एडिन मार्करम (३६० धावा) आणि निकोलस पूरन (३०१ धावा) यांच्यावर हैदराबादच्या फलंदाजीची मदार आहे. भुवनेश्वर, उमरान मलिक, मार्को यान्सेन यांच्यावर गोलंदाजीची धुरा आहे.
- वेळ : सायं. ७.३० वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी