पीटीआय, कोलकाता : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक चढ-उतार, दुखापती, शस्त्रक्रिया आणि वादविवादांचा सामना केला आहे. आक्रमक आणि बिनधास्त वृत्तीमुळे त्याला अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. मात्र, या टीकेकडे दुर्लक्ष करत मैदानावर दर्जेदार कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो.

‘‘लोकांना आपले मत मांडायला आवडते आणि ते त्यांचे कामच आहे. मी त्याबाबत काहीही करू शकत नाही. ‘हार्दिक पंडय़ा’ हे नाव कायमच चर्चेत असते. माझ्याबाबतच्या चर्चेत लोकांना रस आहे आणि याला माझा आक्षेप नाही. मी केवळ हसतमुखाने या चर्चा ऐकतो. त्यांना फारसे महत्त्व देणे मी टाळतो,’’ असे हार्दिक म्हणाला.

हार्दिकने यंदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गुजरातने मंगळवारी राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून मात करत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. हार्दिकने यंदा फलंदाजीत छाप पाडताना १४ सामन्यांत ४५३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने कर्णधार म्हणूनही सर्वाना प्रभावित केले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच दडपणात संयम राखून योग्य निर्णय घेण्याची आपल्यात क्षमता असल्याचे हार्दिकने दाखवून दिले आहे.

‘‘धोनीला माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. तो माझ्यासाठी मोठा भाऊ, मित्र आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणेच आहे. मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. कर्णधार म्हणून वैयक्तिकदृष्टय़ा कणखर राहून सर्व गोष्टी हाताळणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. त्यात मला यश आल्याचे समाधान आहे,’’ असेही हार्दिकने नमूद केले.

मिलरच्या कामगिरीचा अभिमान

राजस्थानविरुद्ध ‘क्वॉलिफायर-१’च्या सामन्यात हार्दिक (नाबाद ४०) आणि डेव्हिड मिलर (नाबाद ६८) यांनी गुजरातच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सामन्यानंतर कर्णधार हार्दिकने आपल्या सहकाऱ्याची स्तुती केली. ‘‘मिलरने यंदाच्या हंगामात केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे. अनेकांना मिलरबाबत शंका होती. मात्र, तो विजयवीराची भूमिका चोख बजावेल याची आम्हाला खेळाडू लिलाव प्रक्रियेपासूनच खात्री होती. तो महत्त्वाचा खेळाडू आहे, याची त्याला जाणीव करून देणे गरजेचे होते,’’ असे हार्दिक म्हणाला.

Story img Loader