पराभवाचे शुक्लकाष्ठ पाठीमागे लागले की त्याचा पिच्छा सोडवता येत नाही, असे म्हणतात आणि तेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाबतीतही दिसून आले. १७४ धावांचा डोंगर रचूनही अ‍ॅडम गिलख्रिस्टचा धमाकेदार स्फोटकी खेळी आणि अझर मेहमूदच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने बंगळुरूचा सात विकेट्स राखून पराभव केला.
बंगळुरूच्या १७५ धावांच्या आव्हानाचा पंजाबने सहजपणे पाठलाग केला तो गिलख्रिस्ट आणि मेहमूद यांच्या धडाकेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर. पहिला बळी २४ धावांवर तंबूत परतल्यावर गिलख्रिस्ट आणि मेहमूद यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला. मेहमूदने यावेळी ४१ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकराच्या जोरावर ६१ धावांची खेळी साकारली. सुरूवातीपासूनच बंगळुरूच्या गोलंदाजांवर तुटून पडणारा गिलख्रिस्ट मेहमूद बाद झाल्यावर डगमगला नाही. बंगळुरूच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत गिलख्रिस्टने ५४ चेंडूंत १० चौकारांसह ३ षटकरांची अतिषबाजी करत नाबाद ८५ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, ख्रिस गेल आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरूने १७४ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर चेतेश्वर पुजाराचा (१९) बळी झटपट गमावला असला तरी गेल आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी रचत संघाला दिडशतक गाठून दिले. बंगळुरूने अखेरच्या दहा षटकांमध्ये १२३ धावांचा पाऊस पाडत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. गेलने ५४ चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकार लगावत ७७ धावांची खेळी साकारली, तर कोहलीने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी साकारली. परविंदर अवानाने यावीळ तीन तर मेहमूदने दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ५ बाद १७४ (ख्रिस गेल ७७, विराट कोहली ५७; परविंदर अवाना ३/३९, अझर मेहमूद २/२४)
पराभूत वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : १८.१ षटकांत ३ बाद १७६ (अ‍ॅडम गिलख्रिस्ट नाबाद ८५, अझर मेहमूद ६१, झहीर खान १/३०) सामनावीर : अ‍ॅडम गिलख्रिस्ट.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा