जिंकण्यासाठी १९१ धावांचे प्रचंड आव्हान.. एकामागोमाग एक बाद होणारे फलंदाज.. मात्र डेव्हिड मिलरने निव्वळ अशक्य वाटावी अशी शतकी खेळी साकारत पंजाबला थरारक विजय मिळवून दिला. मिलर फलंदाजीला आला तेव्हा पंजाबची ३ बाद ५१ अशी स्थिती होती. षटकामागे १२ धावांची आवश्यकता होती मात्र मिलरने ८ चौकार आणि ७ षटकारांसह केवळ ३८ चेंडूत १०१ धावांची अफलातून खेळी साकारत पंजाबला संस्मरणीय विजय मिळवून दिला. आर. सतीशने १८ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २७ धावा करत मिलरला मोलाची साथ दिली.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. शॉन मार्श ६ धावा करून तंबूत परतला. मनदीप सिंगला विनय कुमारने बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला गुरकीरत सिंगही २० धावा करून मुरली कार्तिकच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अनुभवी डेव्हिड हसीलाही झटपट माघारी धाडत मुरली कार्तिकने विजयाचे पारडे बंगळुरूकडे झुकवले. मात्र यानंतर मिलर मैदानावर अवतरला. विनय कुमारने टाकलेल्या चौदाव्या षटकांत १७ तर रुद्रप्रताप सिंगच्या पंधराव्या षटकांत तब्बल २६ धावा कुटत मिलरने पंजाबच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. ४१ धावांवर असताना विराट कोहलीने मिलरला जीवदान दिले आणि बंगळुरूच्या हातून सामना निसटला. मिलर-सतीश जोडीने  चौकार- षटकारांची आतषबाजी करत पाचव्या विकेटसाठी ४९ चेंडूत १३० धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी ख्रिस गेल, चेतेश्वर पुजारा आणि ए बी डीव्हिलियर्स यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १९० धावांचा डोंगर उभारला. दुखापतीतून सावरलेल्या चेतेश्वर पुजाराने ख्रिस गेलसह सलामीला येत शतकी भागीदारी रचली. ख्रिस गेलने नेहमीच्याच स्फोटक पद्धतीने खेळ केला. गेलने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ३३ चेंडूत ६१ धावा केल्या. गेल बाद झाल्यानंतर पुजाराने वेगवान खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर लगेचच फटकेबाजीच्या नादात गोणीच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. पुजाराने ४८ चेंडूत ८ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ३ बाद १९० (ख्रिस गेल ६१, चेतेश्वर पुजारा ५१; मनप्रीत गोणी २/४१) पराभूत विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब : १८ षटकांत ४ बाद १९४ (डेव्हिड मिलर नाबाद १०१, आर. सतीश नाबाद २७, मुरली कार्तिक २/२४) सामनावीर : डेव्हिड मिलर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा