* हैदराबादचा बंगळुरूवर ‘सुपर-ओव्हर’मध्ये थरारक विजय
* कॅमेरून व्हाइटचे दोन षटकार विजयात महत्त्वपूर्ण
* हनुमा विहारीची अष्टपैलू कामगिरी
कोण म्हणतं, आयपीएलचे सामने एकतर्फी होतात! हैदराबाद सनरायझर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने चाहत्यांना एका थरारक सामन्याची मेजवानी दिली. सहाव्या मोसमात पहिल्यांदाच ‘सुपर-ओव्हर’पर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात बंगळुरूवर विजय मिळवून हैदराबादचा सूर्य तेजाने तळपत असल्याचे सनरायझर्सने दाखवून दिले.
बंगळुरूचे १३१ धावांचे उद्दिष्ट गाठताना हैदराबादला सहा चेंडूत सात धावांची आवश्यकता होती. हैदराबादने पाच चेंडूत पाच धावा काढल्या. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना विनय कुमारचा चेंडू मारण्याचा हनुमा विहारीचा प्रयत्न फसला. पण यष्टीरक्षक अरुण कार्तिकने चेंडू यष्टय़ांच्या दिशेने फेकण्याआधीच हैदराबादने एक धाव पळून काढली आणि सामना बरोबरीत सोडवला. ‘सुपर-ओव्हर’मध्ये कॅमेरून व्हाइटने आर. विनय कुमारला दोन षटकार ठोकत तब्बल २० धावा वसूल केल्या. २१ धावांचे आव्हान पार करताना ख्रिस गेल आणि विराट कोहली यांनी चार चेंडूत आठ धावा काढल्या. दोन चेंडूत १३ धावा हव्या असताना गेलने डेल स्टेनला खणखणीत षटकार ठोकून सामन्यातील उत्कंठा आणखीन वाढवली. अखेर शेवटच्या चेंडूवर बंगळुरूला एक धाव काढता आल्याने हैदराबादने ‘सुपर-ओव्हर’मध्ये विजय मिळवला.
बंगळुरूचे आव्हान पेलताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. पार्थिव पटेल हेन्रिक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. अनुभवी कॅमेरून व्हाइटकडून हैदराबादला मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र हेन्रिक्सला मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. त्याने केवळ ५ धावा केल्या. दोन भरवशाचे खेळाडू बाद झाल्यानंतर अक्षत रेड्डी आणि हनुमा विहारीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अपेक्षित धावगतीचे समीकरण गाठण्यात ते पिछाडीवरच राहिले. मुरलीधरनने रेड्डीला बाद करत ही जोडी फोडली. हैदराबाद संघाच्या फलंदाजीची भिस्त असलेल्या संगकाराला जयदेव उनडकतने एका सुरेख चेंडूवर चकवले. थिसारा परेरालाही उनडकतने हेन्रिक्सकडे झेल द्यायला भाग पाडले. हनुमा विहारीने ४४ धावांची एकाकी झुंज दिली.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादच्या शिस्तबद्ध योजनांमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १३० धावांचीच मजल मारता आली. ट्वेन्टी-२० प्रकारात सगळ्यात स्फोटक फलंदाज अशी ख्याती कमावलेला ख्रिस गेल तंदुरुस्ती चाचणी पार करून खेळायला उतरला. मात्र हनुमा विहारी या नवोदित खेळाडूने फसवले. चेंडू कट करण्याचा प्रयत्न गेलच्या अंगलट आला आणि पार्थिव पटेलने त्याचा झेल टिपला.
इशांत शर्माने दिलशानला त्रिफळाचीत करत बंगळुरूला अडचणीत टाकले. कर्णधार विराट कोहलीने सामन्याची सूत्रे हाती
घेतली. कोहलीने मॉइझेस हेन्रिक्सच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ४३ धावा जोडल्या. कोहली धोकादायक ठरणार असे वाटत असतानाच आशिष रेड्डीने स्वत:च्या गोलंदाजीवर अफलातुन झेल टिपत त्याला माघारी धाडले. त्याने ४६ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने संयमी खेळी करणाऱ्या हेन्रिक्सचा महत्त्वपूर्ण बळी इशांत शर्माने मिळवला. त्याने ४४ धावांची खेळी केली. कोहली-हेन्रिक्स जोडीचा अपवाद वगळता बंगळुरूच्या एकाही फलंदाजाला सनरायझर्सच्या गोलंदाजांचा आत्मविश्वासाने सामना करता आला नाही. इशांत शर्माने २७ धावांत ३ बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ८ बाद १३० (विराट कोहली ४६, मॉइझेस हेन्रिक्स ४४, इशांत शर्मा ३/२७) पराभूत विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १३० (हनुमा विहारी नाबाद ४४, अक्षत रेड्डी २३; मोझेस हेन्रिक्स २/१४, जयदेव उनाडकट २/२४).
सामनावीर : हनुमा विहारी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा