साखळी फेरीत बलाढय़ संघांना धक्के देणाऱ्या राजस्थान रॉयल्सने बुधवारी हैदराबाद सनरायजर्सचा धुव्वा उडवला. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि ब्रॅड हॉजच्या तुफान फटकेबाजीमुळे राजस्थानने चार बळी राखून ‘एलिमिनेटर’ सामन्याचे शिखर सर केले. आता अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानला मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागेल.
सनरायजर्सचे १३३ धावांचे आव्हान पेलताना राजस्थान रॉयल्सने सावध सुरुवात केली. पण त्यांना कर्णधार राहुल द्रविडला (१२) स्वस्तात गमवावे लागले. अजिंक्य रहाणे (१८) आणि शेन वॉटसन (२४) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावा जोडत विजयाच्या दिशेने मार्गक्रमणा केली. मात्र डॅरेन सॅमीने दोन धक्के देत त्यांची १ बाद ४९ अशा स्थितीतून ५ बाद ५७ अशी अवस्था केली. ब्रॅड हॉज आणि संजू सॅमसन यांनी ४५ धावांची भागीदारी रचत राजस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. अखेरच्या षटकामध्ये १० धावांची आवश्यकता असताना ब्रॅड हॉजने सॅमीला लागोपाठ दोन षटकार ठोकत राजस्थानला चार बळी राखून हा सामना जिंकून दिला. हॉजने २९ चेंडूंत २ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ५४ धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी, शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने सनरायजर्सला ७ बाद १३२ धावांवर रोखले होते. राजस्थान रॉयल्सच्या वेगवान माऱ्याचा समर्थपणे सामना करण्यात सनरायजर्सच्या फलंदाजांना अपयश आले.
विक्रमजीत मलिकने लागोपाठच्या षटकांमध्ये पार्थिव पटेल आणि हनुमा विहारी यांना लवकरच माघारी पाठवत सनरायजर्सला २ बाद ३ अशा अडचणीत आणले. पहिल्या सहा षटकांच्या पॉवर-प्लेमध्ये सनरायजर्सना फक्त २७ धावाच करता आल्या. त्यानंतर शिखर धवन (३३) आणि कर्णधार कॅमेरून व्हाईट (३१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचून सनरायजर्सच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर डॅरेन सॅमीने तीन षटकारांची आतषबाजी करत सनरायजर्सची धावगती वाढवली. पण चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सॅमी २९ धावांवर बाद झाल्यानंतर सनरायजर्सच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. राजस्थानकडून मलिकने दोन तर जेम्स फॉल्कनर, सिद्धार्थ त्रिवेदी आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १३२ (शिखर धवन ३३, कॅमेरून व्हाईट ३१; विक्रमजीत मलिक २/१४) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १९.२ षटकांत ६ बाद १३५ (ब्रॅड हॉज नाबाद ५४, शेन वॉटसन २४; डॅरेन सॅमी २/२७).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा