पुणे वॉरियर्सचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. खेळपट्टीबाबत धसका घेण्यासारखी स्थिती नव्हती. किंग्ज इलेव्हनच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली आणि त्यांना त्यांच्या क्षेत्ररक्षकांनीही चांगली साथ दिली. त्यातच पुण्याच्या फलंदाजांनी बेजबाबदारपणे फटके मारत पंजाबचे काम सोपे केले. रॉबिन उथप्पा (१९), रॉस टेलर (१५), अभिषेक नायर (नाबाद २५), मिचेल मार्श (१५) यांचा अपवाद वगळता पुण्याच्या अन्य फलंदाजांनी सपशेल हाराकिरी केली. ट्वेन्टी-२० सामन्यात प्रेक्षक फटकेबाजीच्या अपेक्षेने आलेले असतात. त्यांना घरच्या फलंदाजांचा निराशाजनक खेळ पाहावयास मिळाला. मार्शने प्रवीणकुमारच्या एकाच षटकात एक षटकार व एक चौकार मारून काही अंशी मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फार वेळ टिकला नाही. नायरने जबाबदारीने खेळ करताना आक्रमक फटकेही मारले. त्याने २६ चेंडूंत नाबाद २५ धावा करताना तीन चौकार मारले. पाठीच्या दुखण्यामुळे युवराजसिंग खेळू शकला नाही. त्याच्या जागी खेळणाऱ्या तिरुमलासेटी सुमन याने सपशेल निराशा केली. पंजाबच्या खेळाडूंनी सुरेख क्षेत्ररक्षण केले. त्यांच्या गुरकिरतसिंग मान याने रॉस टेलर याचा सीमारेषेजवळ हवेत सूर मारून घेतलेला झेल संस्मरणीय तसेच मनदीपसिंग व पीयूष चावला यांनी अनुक्रमे मर्लान सॅम्युअल्स व राहुल शर्मा यांना धावबाद करताना केलेले थ्रो अचूकतेचा प्रत्यय होता.
संक्षिप्त धावफलक : पुणे वॉरियर्स- २० षटकांत ९ बाद ९९ (मनीष पांडे ०, मर्लान सॅम्युअल्स ३, रॉबिन उथप्पा १९, अँजेलो मॅथ्यूज ४, रॉस टेलर १५, अभिषेक नायर नाबाद २५, मिचेल मार्श १५, भुवनेश्वरकुमार ८, राहुल शर्मा १; प्रवीणकुमार २/३१, अजहर मेहमूद २/१९, रियान हॅरिस १/१२, परविंदर अवाना १/१६, पीयूष चावला १/१९) पराभूत विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब- १२.२ षटकांत २ बाद १०० (अॅडम गिलख्रिस्ट १५, मनदीपसिंग ३१, मनन व्होरा नाबाद ४३, डेव्हिड हसी नाबाद ८; अँजेलो मॅथ्यूज १/१२, राहुल शर्मा १/२०). सामनावीर : मनन व्होरा.
उत्साही प्रेक्षक व विक्रेते!
या मोसमातील आयपीएलचा पुण्यातील पहिलाच सामना असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र गतवर्षी आयपीएलच्या लढतींना जेवढी गर्दी होती, त्या तुलनेत यंदा गर्दी कमी होती. दोन्ही संघांच्या विशेषत: पुण्याचे बोधचिन्ह असलेले ध्वज, रंगीत टोप्या, टीशर्ट्स याला प्रेक्षकांकडून चांगली मागणी होती. ज्या ठिकाणी जास्त किमतीची तिकि टे त्या ठिकाणी टीशर्ट्सच्या किमती जास्त होत्या. पुण्याच्या फलंदाजांनी केलेली निराशा सोडली, तर पंजाबच्या फलंदाजांनी चांगली फटकेबाजी करीत प्रेक्षकांना खेळाचा आनंद मिळवून दिला. पंजाब संघाची मालकीण व ख्यातनाम सिनेअभिनेत्री प्रीति झिंटा हिची उपस्थिती प्रेक्षकांचा उत्साह वाढविणारी ठरली. पुण्याची फलंदाजी आटोपल्यावर अनेक प्रेक्षक स्टेडियमबाहेर जाऊ लागले, कारण त्यांना पुण्याचा पराभव अटळ आहे हे लक्षात आले होते. आणखी लाजिरवाणी कामगिरी पाहण्याऐवजी वेळेवर पुण्यात जावे असेच त्यांना वाटत होते.
फलंदाजांनी निराशा केली : मॅथ्यूज
खेळपट्टी फलंदाजीस पोषक होती, मात्र त्याचा फायदा आम्हाला घेता आला नाही. भरवशाच्या फलंदाजांनी हकनाक विकेट्स गमावल्या व पराभव ओढवून घेतला, अन्यथा आमचे पंजाबपुढे १६० धावांचे लक्ष्य ठेवायचे ध्येय होते, असे सांगून पुण्याचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज म्हणाला, पंजाबच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत आमच्या फलंदाजांना चांगलेच रोखले. त्यांच्या क्षेत्ररक्षकांची कामगिरी लक्षणीय होती. युवराजची अनुपस्थिती जाणवली काय, असे विचारले असता मॅथ्यूज म्हणाला, युवराज हा आमचा मुख्य आधारस्तंभ आहे. पहिल्या सामन्यात तो गोलंदाजीत यशस्वी ठरला होता. मात्र फलंदाजीत अपयशी ठरला होता. तरीही त्याच्यावर आमची मोठी मदार असते. त्याच्या अनुपस्थितीचे दडपण अन्य खेळाडूंवर आले असावे. लागोपाठ दोन पराभव स्वीकारले असले तरी आम्ही नंतरच्या सामन्यांमध्ये विजय निश्चितपणे मिळवू.
सांघिक कामगिरीचा विजय : गिलख्रिस्ट
सर्वच आघाडय़ांवर आमच्या खेळाडूंनी अव्वल दर्जाची कामगिरी केली, त्यामुळेच आम्ही पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय मिळवू शकलो. या विजयाचे श्रेय माझ्या सर्व खेळाडूंना आहे, असे पंजाबचा कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट याने सांगितले. तो पुढे म्हणाला, नाणेफेक गमावल्यानंतर आम्ही पुण्यास दीडशे धावांमध्ये रोखण्याचे ध्येय ठेवले होते. आमच्या गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांना फटकेबाजीची फारशी संधी दिली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होत गेल्या आणि या चुका आमच्या पथ्यावर पडल्या. गुरकिरतसिंग याने घेतलेला झेल अप्रतिम होता. आमच्या युवा खेळाडूंनी सुरेख कामगिरी केली. हा आमचा पहिलाच सामना होता आणि त्यात एकतर्फी विजय मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.
पुणे वॉरियर्सची हाराकिरी
पहिल्याच सामन्याचा कित्ता गिरवीत पुणे वॉरियर्सच्या फलंदाजांनी केलेल्या आत्मघातकी फलंदाजीमुळेच किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्यांना लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. विजयासाठी असलेले केवळ १०० धावांचे लक्ष्य पंजाबने आठ विकेट्स आणि ७.४ षटके बाकी राखून पार केले आणि आयपीएलमध्ये विजयी प्रारंभ केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2013 at 02:16 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2013 kings xi punjab beat pune warriors india by 8 wickets