सलामीच्या सामन्यातच विजयाची चव चाखल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आत्मविश्वासात आहेत. आयपीएलच्या सहाव्या मोसमात विजयाचा सिलसिला कायम राखण्यासाठी कोलकाता आणि राजस्थान हे दोन्ही संघ उत्सुक आहेत.
गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने उद्घाटनाच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सहा विकेट्सनी सहज विजय मिळवला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला पाच धावांनी हरवले होते. गेल्या वर्षी याच मैदानावर राजस्थानने कोलकाताला २२ धावांनी पराभूत केल्यामुळे या सामन्यात राजस्थानचे पारडे काहीसे जड मानले जात आहे. दिल्लीविरुद्धच्या गेल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार राहुल द्रविडने ५१ चेंडूंत ६५ धावांची खेळी साकारली होती. त्याचबरोबर स्टुअर्ट बिन्नीने तुफानी फटकेबाजी करत २० चेंडूत ४० धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे राजस्थानला दिल्लीवर सरशी साधता आली. अजिंक्य रहाणे आणि कुशल परेरा या सलामीवीरांनी राजस्थानला सुरेख सुरुवात करून दिली होती, पण मोठी खेळी करण्यात त्यांना अपयश आले होते.
सवाई मानसिंग स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात राजस्थान संघात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. वॉटसनच्या समावेशामुळे राजस्थानची बाजू मजबूत झाली आहे. मात्र राजस्थानला द्रविडच्या दुखापतीची चिंता सतावत आहे. क्षेत्ररक्षण करताना ४० वर्षीय द्रविडच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यामुळे तो दिल्लीच्या डावात क्षेत्ररक्षणाला उतरू शकला नव्हता, पण कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न द्रविड करणार आहे. ‘‘मला बऱ्याच वेदना होत आहेत, पण मी पुढील सामन्यात खेळण्याचा प्रयत्न करणार आहे, पण सोमवारी माझ्या दुखापतीचे स्वरूप कसे असेल, यावरूनच मी खेळण्याचा निर्णय घेईन,’’ असे द्रविडने सांगितले.
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजीही चांगली होत आहे. त्यांच्या केव्हिन कूपरने ३० धावांत ३ विकेट्स मिळवत प्रतिस्पर्धी फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. शॉन टेट, एस. श्रीसंथ आणि सॅम्युएल बद्री यांच्याकडून राजस्थानला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
कोलकाता संघ गेल्या वर्षीच्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. कोलकाताने दिल्लीचे १२९ धावांचे आव्हान सहज पार केले तरी कर्णधार गौतम गंभीरसह, जॅक कॅलिस, मनोज तिवारी, इऑन मॉर्गन आणि युसुफ पठाण यांनी आपल्या क्षमतेनुसार खेळ केला होता. त्यामुळे राजस्थानच्या प्रभावहीन गोलंदाजीवर वर्चस्व गाजवण्याचा कोलकाताचा प्रयत्न असेल. कोलकाताचा जादुई फिरकीपटू सुनील नरिनच्या गोलंदाजीवर दिल्लीच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. नरिनने १३ धावांत चार विकेट्स मिळवत कोलकाताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली याच्यावर कोलकाताच्या वेगवान गोलंदाजीची भिस्त आहे. त्याचबरोबर लक्ष्मीपती बालाजी, कॅलिस, रजत भाटिया आणि लक्ष्मी रतन शुक्ला यांच्या गोलंदाजीवर कोलकाताला अवलंबून राहावे लागणार आहे.
सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी ट्वेन्टी-२० सामन्यासाठी योग्य असली तरी या सामन्यात दवाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे क्युरेटर तपोश चॅटर्जी यांना वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा