* राजस्थानची दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ५ धावांनी मात
* डेव्हिड वॉर्नरची ७७ धावांची खेळी व्यर्थ
एक धावचीतची विकेट किती निर्णायक ठरू शकते याचा अनुभव राजस्थान रॉयल्सने घेतला आणि सहाव्या हंगामाची विजयाने सुरुवात केली. १५६ धावांचा पाठलाग करताना दिल्लीने डेव्हिड वॉर्नरच्या मॅरेथॉन खेळीच्या जोरावर ३ बाद १५३ अशी स्थिती गाठलेली.. विजयाचे लक्ष्य आवाक्यात, मात्र एक चोरटी धाव घेण्याचा वॉर्नरचा प्रयत्न ब्रॅड हॉजच्या थेट धावफेकीमुळे फसला.. ७७ धावा करून वॉर्नर बाद झाला त्या वेळी दिल्लीला ९ चेंडूत १३ धावांची आवश्यकता.. मात्र राजस्थानच्या खेळाडूंनी दडपणाच्या क्षणी आपला खेळ उंचावत हंगामाची सुरुवात निसटत्या विजयाने केली. जोहान बोथा आणि आंद्रे रसेल यांनी केलेल्या नाहक चुकाही दिल्लीच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्या.
शेवटच्या षटकांत दिल्लीला ९ धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर बोथाने तर दुसऱ्या चेंडूवर रसेलने एक धाव घेतली. मात्र तिसऱ्या चेंडूवर कूपरने बोथाला पायचीत केले. बोथा बाद झाल्यामुळे इरफान पठाण खेळपट्टीवर दाखल झाला. त्याने एक धाव घेत रसेलला स्ट्राईक दिला. मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन चौकार मारण्याचा रसेलचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि तो त्रिफळाचीत झाला. शेवटच्या चेंडूवर एका चेंडूत सहा धावांची आवश्यकता होती. मात्र हा चमत्कार करणे खेळपट्टीवर काही सेकंदापूर्वी दाखल झालेल्या नमन ओझाला जमले नाही आणि रॉयल्सने अवघ्या ५ धावांनी विजय साकारला. केव्हॉन कूपरने ३० धावांत ३ बळी घेत या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
वॉर्नरने ९ चौकार आणि एका षटकारासह ५६ चेंडूंत ७७ धावांची तडाखेबंद खेळी केली. मात्र ही खेळीही दिल्लीला विजय मिळवून देऊ शकली नाही. सुरुवातीला संथ आणि धीमा खेळ करणाऱ्या वॉर्नरने खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर फटक्यांची पोतडी उघडली. उन्मुक्त चंद, माहेला जयवर्धने यांनी साथ सोडल्यानंतरही वॉर्नरने एक बाजू लावून धरली. धोकादायक फटके न खेळता खेळपट्टीवर टिकून राहण्याचे तत्त्व वॉर्नरने अवलंबले. वॉर्नरला मॅरेथॉन खेळीदरम्यान दोनदा जीवदान लाभले. वॉर्नरचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविड दुखापतग्रस्त झाला. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात ब्रेट लीच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झालेल्या उन्मुक्त चंदने आश्वासक सुरुवात केली. मात्र श्रीसंतच्या एका सुरेख चेंडूवर उन्मुक्तचा बचाव तोकडा पडला आणि त्याला त्रिफळाचीत होऊन तंबूत परतावे लागले. चंद-वॉर्नर जोडीने पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. जयवर्धनेने वॉर्नरला साथ देत डाव सावरला. जयवर्धने अजिंक्य रहाणेच्या अफलातून झेलमुळे माघारी परतला.
तत्पूर्वी कर्णधार राहुल द्रविडच्या शैलीदार ६४ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दीडशेचा टप्पा ओलांडला. श्रीलंकेच्या कुशल परेराने ३ सणसणीत चौकार खेचत दणक्यात सुरुवात केली. मात्र उमेश यादवने बाद करत दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. यानंतर राहुल द्रविड-अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करत मोठय़ा धावसंख्येसाठी पायाभरणी केली. मोठा फटका खेळण्याच्या नादात अजिंक्य शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २८ धावा केल्या. द्रविडच्या साथीला आलेल्या स्टुअर्ट बिन्नीने जोरदार फटकेबाजी केली. या जोडीने पाच षटकांत ५५ धावांची भागीदारी केली. बिन्नीने ३ षटकार आणि २ चौकारांच्या साथीने २० चेंडूत ४० धावा केल्या. उमेश यादवने त्याला त्रिफळाचीत केले. एकेरी-दुहेरी धावा आणि योग्य वेळी धोका पत्करत चौकार-षटकार असा पवित्रा घेणाऱ्या द्रविडने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र धावगती वाढवण्याच्या प्रयत्नांत उमेश यादवच्या चेंडूवर तो बाद झाला. द्रविड बाद झाल्यानंतर रॉयल्सच्या डावाची घसरण झाली. राजस्थानने १६५ धावांची मजल मारली. उमेश यादवने २४ धावांत ४ बळी घेतले. नेहराने २ तर नदीमने १ बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स- २० षटकांत ७ बाद १६५ (राहुल द्रविड ६५, स्टुअर्ट बिन्नी ४०; उमेश यादव ४/२४) विजयी विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स- २० षटकांत ६ बाद १६० (डेव्हिड वॉर्नर ७७, उन्मुक्त चंद २३, मनप्रीत जुनेजा २०; केव्हॉन कूपर ३/३०, श्रीसंत १/१८)
सामनावीर : राहुल द्रविड.
रॉयल्सची निसटती बाजी
* राजस्थानची दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ५ धावांनी मात * डेव्हिड वॉर्नरची ७७ धावांची खेळी व्यर्थ एक धावचीतची विकेट किती निर्णायक ठरू शकते याचा अनुभव राजस्थान रॉयल्सने घेतला आणि सहाव्या हंगामाची विजयाने सुरुवात केली. १५६ धावांचा पाठलाग करताना दिल्लीने डेव्हिड वॉर्नरच्या मॅरेथॉन खेळीच्या जोरावर ३ बाद १५३ अशी स्थिती गाठलेली.. विजयाचे लक्ष्य आवाक्यात,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-04-2013 at 02:40 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2013 rajasthan royals beat delhi daredevils by five runs