रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातल्या सामन्यात चाहत्यांना ‘सुपर’ थरार अनुभवता आला. या मोसमातील सुपर-ओव्हरमध्ये रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरूने दिल्लीवर ४ धावांनी विजय साकारला. ‘सुपर-ओव्हर’मध्ये पहिल्या चार चेंडूंवर उमेश यादवने तीनच धावा देत दिल्लीच्या विजयाच्या आशा उंचावल्या. पण ए बी डीह्णव्हिलियर्सने पुढील दोन्ही चेंडूंवर दोन खणखणीत षटकार ठोकत दिल्लीसमोर विजयासाठी १६ धावांचे आव्हान ठेवले. पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर दिल्लीचे धाबे दणाणले होते. इरफान पठाणने रवी रामपॉलला एक चौकार आणि एक षटकार ठोकला. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना रामपॉलने बेन रोहररचा त्रिफळा उडवला आणि बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीचा हा सलग पाचवा पराभव ठरला.

त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी अखेरच्या षटकांत शरणागती पत्करल्यामुळे या मोसमातील दुसरा सामना ‘सुपर-ओव्हर’मध्ये गेला. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना इरफान पठाणने चेंडू निर्धाव टाकला. पण चेंडू यष्टिरक्षकाकडून परत येईपर्यंत रवी रामपॉल आणि विनय कुमार यांनी एक धाव काढली आणि सामन्यातला थरार आणखीन वाढवला.

तुफान फॉर्मात असलेल्या ख्रिस गेलने मॉर्नी मॉर्केलला दोन घणाघाती षटकार लगावत आपण एकहाती हा सामना बंगळुरूला जिंकून देणार, याची झलक दाखवली. पण सलामीवीर म्हणून संधी मिळालेल्या लोकेश राहुलला आशिष नेहराने आणि धोकादायक ख्रिस गेलला मॉर्केलने बाद करत बंगळुरूला अडचणीत आणले. या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीने ए बी डीह्णव्हिलियर्सच्या साथीने दिल्लीच्या गोलंदाजांवर आक्रमण चढविले. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत कोहली आणि डीह्णव्हिलियर्सने सहजपणे धावा वसूल केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचून बंगळुरूला विजयासमीप आणून ठेवले. पण चोरटी धाव घेण्याच्या नादात डीह्णव्हिलियर्सने स्वत:ची खेळी संपुष्टात आणली. त्याने तीन चौकार आणि एक षटकारासह ३९ धावा केल्या. कोहली आणि डीह्णव्हिलीयर्स मैदानावर असताना बंगळुरू हा सामना सहज जिंकेल, असे वाटले होते. पण अ‍ॅन्ड्रय़ू मॅकडोनाल्ड (०), अरुण कार्तिक (५), सय्यद मोहम्मद (१) तसेच कोहली झटपट बाद झाल्याने बंगळुरूवर पराभवाचे सावट ओढवले. कोहलीने सात चौकार आणि एक षटकारासह ६५ धावा फटकावल्या. ६ चेंडूत १२ धावांची आवश्यकता असताना रवी रामपॉलने इरफानला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सामन्यात रंगत आणली. एका चेंडूवर एक धाव हवी असताना इरफान पठाणचा चेंडू यष्टिरक्षकाकडे गेला. पण तोपर्यंत रामपॉल आणि विनय कुमार यांनी एक धाव पळून काढत सामना ‘सुपर-ओव्हर’मध्ये नेला.

तत्पूर्वी, चांगल्या सुरुवातीनंतरही दिल्लीला २० षटकांत ५ बाद १५२ धावाच करता आल्या. सेहवागने जयदेव उनाडकटला एकाच षटकांत तीन चौकार लगावले. पण चांगली सुरुवात केल्यानंतर सेहवाग आणि वॉर्नर यांनी एकापाठोपाठ आपली विकेट गमावली. १४.१ षटकांत दिल्लीची ४ बाद ९१ अशी स्थिती झाली असताना केदार जाधव आणि इरफान पठाण यांनी सहाव्या विकेटसाठी ३० धावांची अभेद्य भागीदारी रचली. या दोघांनी रवी रामपॉल आणि रुद्रप्रताप सिंग यांच्या अखेरच्या दोन षटकांत प्रत्येकी १५ धावा वसूल केल्या. जाधवने सर्वाधिक नाबाद २९ धावांची खेळी केली. इरफानने त्याला चांगली साथ देत नाबाद १९ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ५ बाद १५२ (केदार जाधव नाबाद २९, महेला जयवर्धने २८; जयदेव उनाडकट २/२४) पराभूत विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ७ बाद १५२ (विराट कोहली ६५, ए बी डी’व्हिलियर्स ३९; उमेश यादव २/२२).