किंग्ज इलेव्हन पंजाबला त्यांच्याच मैदानावर चारीमुंडय़ा चीत करून सनरायजर्स हैदराबादने शनिवारी विजयाचा भांगडा केला. सामन्याचे पारडे पंजाबच्या बाजूने झुकले असताना पार्थिव पटेल आणि थिसारा परेरा यांनी अखेरच्या क्षणी केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळे हैदराबादने पंजाबसमोर आव्हानात्मक उद्दिष्ट ठेवले. हे आव्हान पार करताना पंजाबची दमछाक झाली आणि त्यांना ३० धावांनी हार पत्करावी लागली.
मनदीपला स्वस्तात गमावल्यानंतर कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट (२६) आणि शॉन मार्श (१८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भर घातली. पण डॅरेन सॅमीने एकापाठोपाठ तीन धक्के दिल्यामुळे पंजाबची ४ बाद ५१ अशी अवस्था झाली. ल्युक पोमेर्सबॅकने (नाबाद ३३) एका बाजूने किल्ला लढवला, पण पंजाबचा विजय त्याला साकारता आला नाही. हैदराबादकडून सॅमीने चार बळी घेतले.
तत्पूर्वी, पार्थिव पटेलची अर्धशतकी खेळी आणि त्याने थिसारा परेरासह अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे सनरायजर्सला ७ बाद १५० धावांपर्यंत मजल मारली आली. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या संदीप शर्माने सनरायजर्सच्या डावाला खिंडार पाडत नवव्या षटकांत त्यांची ५ बाद ५२ अशी स्थिती केली होती. पण पार्थिव (६१) आणि परेरा (नाबाद ३२) यांच्या सुरेख फलंदाजीमुळे सनरायजर्सने सन्मानजनक धावसंख्या उभारली. संदीप शर्माने २१ धावांच्या मोबदल्यात तीन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १५० (पार्थिव पटेल ६१, थिसारा परेरा नाबाद ३२; संदीप शर्मा ३/२१) विजयी वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ९ बाद १२० (ल्युक पोमेर्सबॅक नाबाद ३३, अ‍ॅडम गिलख्रिस्ट २६; डॅरेन सॅमी ४/२२, डेल स्टेन २/२०)
सामनावीर : पार्थिव पटेल.