दिमाखदार सुरुवातीनंतर घसरण होत पुन्हा विजयपथावर परतलेला चेन्नई सुपर किंग्स आणि पराभवाच्या पंचकाने स्पर्धेतले आव्हान धोक्यात आलेले असताना जिद्दीने खेळ करत विजयाची सवय बाणवून घेत अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबई इंडियन्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या हंगामाची अंतिम लढत रंगणार आहे. विशेष म्हणजे क्वालिफायर एकच्या लढतीत मुंबईने चेन्नईवर मात केली होती. मात्र एलिमिनेटरच्या लढतीत बंगळुरूवर मात करत चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली. क्वालिफायर लढतीतील पराभवाची परतफेड करण्याचा चेन्नईचा मनसुबा आहे, तर आयपीएलमधील सगळ्यात जास्त विजयी सातत्य राखणाऱ्या चेन्नईचे साम्राज्य खालसा करण्याचा मुंबईचा मानस आहे.
स्पॉटफिक्सिंग आणि संघाची ब्रँड व्हॅल्यू अत्यंत कमी दाखवल्याप्रकरणी चेन्नई सुपर किंग्सचा संघ अडचणीत सापडला आहे. मात्र मैदानाबाहेरील घटनांचा खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता चेन्नईने सहाव्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. दुसरीकडे रिकी पॉन्टिंग, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, शेन बाँड, जॉन्टी ऱ्होड्स अशा एकापेक्षा एक धुरिणांचे मार्गदर्शन लाभलेल्या मुंबई इंडियन्सने पाच पराभवांतून बोध घेत दमदार भरारी घेतली आहे. आयपीएलमध्ये या दोन्ही संघांमध्ये झालेला प्रत्येक सामना रोमहर्षक ठरला आहे. त्यामुळे आठव्या हंगामाची अंतिम लढत ही चाहत्यांना दर्जेदार खेळाची पर्वणी असेल यात शंकाच नाही.
तडाखेबंद फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलमची अनुपस्थिती चेन्नईला प्रकर्षांने जाणवणार आहे. मॅक्क्युलमच्या अनुपस्थितीत अनुभवी माइक हसी आणि ड्वेन स्मिथ यांच्यावर भक्कम सलामी देण्याची जबाबदारी आहे. फॅफ डू प्लेसिस सातत्याने धावा करत आहे. मात्र भरवशाचा सुरेश रैना मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. अंतिम फेरीच्या भव्य व्यासपीठावर निर्णायक खेळी करण्यासाठी रैना सज्ज आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बंगळुरूविरुद्ध छोटी, पण महत्त्वपूर्ण खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. मुंबईच्या दमदार गोलंदाजीसमोर धोनीचा फॉर्म कळीचा ठरणार आहे. रविचंद्रन अश्विन, पवन नेगी आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीत योगदान दिल्यास चेन्नईला फायदेशीर ठरू शकते.
घोटीव यॉर्कर आणि भन्नाट स्विंग गोलंदाजी करणारा आशीष नेहरा धोनीसाठी हुकमी एक्का आहे. अंतिम लढतीत मुंबईच्या बलाढय़ फलंदाजीला रोखणं नेहरासमोरचे आव्हान आहे. त्याच्या साथीला मोहित शर्मा आणि ईश्वर पांडे आहेत. विकेट्स मिळवणे आणि धावा रोखण्यासाठी ड्वेन ब्राव्हो निर्णायक आहे. कोलकाताच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर अश्विन, जडेजा आणि नेगी महत्त्वपूर्ण ठरू शकतात.
पार्थिव पटेल आणि लेंडल सिमन्स यांनी प्रत्येक लढतीत मुंबईला चांगली सलामी दिली आहे. अंतिम फेरीतही या जोडीवर मोठी जबाबदारी आहे. कर्णधार रोहित शर्माला मोठी खेळी करावी लागेल. अंबाती रायुडू आणि कीरेन पोलार्ड ही जोडगोळी मुंबईसाठी निर्णायक आहे. हार्दिक पंडय़ाची फटकेबाजी चेन्नईला डोकेदुखी ठरू शकते. लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघान, विनय कुमार या त्रिकुटाने शानदार कामगिरी केली. हरभजन सिंग आणि जगदीशा सुचिथ यांची फिरकी उपयुक्त ठरू शकते.
स्पर्धेत कशी कामगिरी झाली आहे याला काही अर्थ उरत नाही. जेतेपदासाठी अंतिम लढत जिंकणे क्रमप्राप्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेहनतपूर्वक आम्ही अंतिम फेरी गाठली आहे. हे परिश्रम व्यर्थ जाऊ द्यायचे नाहीयेत. यंदाच्या हंगामाची सुरुवात अडखळत झाली, मात्र सूर गवसल्यानंतर आम्ही दिमाखदार खेळ केला आहे. चेन्नईचा संघ बलाढय़ आहे, मात्र त्यांना नमवण्याची क्लृप्ती आमच्याकडे आहे.
रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सचा कर्णधार

मुंबई इंडियन्स अव्वल संघ आहे आणि त्यांनी यंदा शानदार खेळ करत अंतिम फेरी गाठली आहे. क्वालिफायर एकच्या लढतीतही ते आमच्यापेक्षा सरस ठरले होते. सर्वोत्तम खेळ केला तरच अंतिम लढतीत मुंबई इंडियन्सवर मात करता येईल. फलंदाजी किंवा गोलंदाजी- सुरुवात चांगली होणे महत्त्वाचे आहे. मोठय़ा लढतींमध्ये चेन्नईची कामगिरी बहरते.
माइक हसी, चेन्नई सुपर किंग्स</strong>

आमनेसामने कामगिरी
एकूण- २१
चेन्नई सुपर किंग्स- १०
मुंबई इंडियन्स- ११

२०१५ हंगाम
एकूण-३
चेन्नई सुपर किंग्स-१
मुंबई इंडियन्स-२

सामन्याची वेळ : रात्री ८ पासून
थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स आणि सोनी सिक्स

मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2015 final chennai super kings vs mumbai indians