कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेला आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा सहावा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. कोलकाताने समोर ठेवलेले १२९ धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघाची चांगलीच दमछाक झाली. कोलकाताच्या फलंदाजांनी बंगळुरुच्या गोलंदाजांना चांगलंच खिंडीत पकडलं होतं. बंगळुरुचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे हा सामना कोलकाता जिंकतो की काय ? अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातही यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनने घेतलेला टिपलेल्या अफलातून झेलने तर बंगळुरुची चिंता चांगलीच वाढवली होती.
शेल्डनने झेल टिपला अन् बंगळुरुचं टेन्शन वाढलं
बंगळुरुचे पहिल्या फळीतील खेळाडू चांगली कामगिरी करु शकले नाही. फाफ डू प्लेलिस (५), अनुज रावत (०), विराट कोहली (१२) हे तिन्ही फलंदाज लागोपाठ बाद झाले. त्यानंतर डेविड वेली १८ धावा करुन बाद झाल्यानंतर शेरफन रुदरफोर्डवर संपूर्ण जबाबदारी आली. त्याने मैदानावर हळूहळू पाय रोवायला सुरुवात केली.
रुदरफोर्ड चांगलेच फटके मारत असल्यामुळे कोलकाता संघाची चिंता वाढली होती. त्यामुळे त्याला बाद करणे कोलकातासाठी गरजेचे होऊन बसले. दरम्यान, टिम साउथीने टाकलेल्या चेंडूवर रुदरफोर्डने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची किनार पकडून थेट यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनच्या दिशेने गेला. हा झेल टिपण्यासाठी शेल्डनने मोठी उडी घेतली. शेल्डनच्या या कामगिरीमुळेच रुजरफोर्ड २८ धावांवर बाद झाला आणि सामना फिरला.
मात्र शेवटी बंगळुरुचा दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी जबाबदारीने खेळत शेवटच्या क्षणी अनुक्रमे १४ आणि १० धावा केल्या. त्यामुळे बंगळुरुला विजय मिळवता आला. मात्र शेल्डनने टीपलेल्या झेलमुळे सामना चांगलाच फिरला होता. याच कारणामुळे शेल्डनच्या या कॅचची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.