IPL 2020 ची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी सारेच खेळाडू कंबर कसून तयारीला लागले आहेत. पंजाबचा दमदार फलंदाज मयंक अग्रवाल हा आपल्या फलंदाजीवर विशेष मेहनत घेत असल्याचे दिसते आहे. भारतीय संघात कसोटीपटू म्हणून त्याची ओळख आहे, त्यामुळे टी२० क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी तो फटकेबाजीचा सराव करतो आहे. याचसंदर्भात बोलताना, “टी२० क्रिकेटमध्ये फटकेबाजी हाच पर्याय असतो”, असे मत त्याने व्यक्त केले.
“कसोटी क्रिकेट हे टी२० पेक्षा खूपच वेगळं असतं. कसोटी क्रिकेटमध्ये धावांपेक्षा खेळपट्टीवर टिकून खेळणं महत्त्वाचं मानलं जातं. याउलट टी२० क्रिकेटमध्ये मात्र फटकेबाजीला पर्याय नसतो. स्फोटक फलंदाजी करणं ही टी२० क्रिकेटची गरज असते. पण त्याचसोबत महत्त्वाचं असतं ते फटकेबाजीचं तारतम्य बाळगणं. फटकेबाजी करताना जीवनदान मिळण्याची शक्यता खूप कमी असते. फटका चुकण्याची शक्यतादेखील अधिक असते. तुम्ही जर चूक केलीत, तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्या एका चुकीसाठी टपलेलाच असतो. टी२० क्रिकेटमध्ये प्रचंड जोखीम असते, पण सातत्याने जोखीम उचलत मोठे फटके खेळणं हे टी२० क्रिकेटसाठी आवश्यक असतं”, असं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना मयंक अग्रवाल म्हणाला.
Suit up. Grind hard! #SaddaPunjab #IPL2020 pic.twitter.com/YdxcMYAFaJ
— Mayank Agarwal (@mayankcricket) September 3, 2020
“लॉकडाउन काळातदेखील आम्ही खूपवेळा IPLबद्दल चर्चा केली. अनिल भाईंनी मला खेळ सुधारण्याच्या दृष्टीने खूप सूचना केल्या. आम्ही खूप व्हिडीओ पाहिल्या. त्यातील बारकावे काय असतात त्याबद्दल आम्ही चर्चा केली. तेव्हा ४० धावा केल्यावर त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर कसं करायचं तेदेखील त्यांनी मला समजावलं”, असेही मयंकने नमूद केलं. मयंक अग्रवाल आतापर्यंत ७७ IPL सामने खेळले असून त्यात १,२६६ धावा केल्या आहेत. त्याची स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ६८ आहे. त्याने आतापर्यंत ५ अर्धशतके झळकावली आहेत, पण त्याला अद्याप शतक ठोकता आलेले नाही.