IPL च्या तेराव्या हंगामाची सुरुवात, स्पर्धेतील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई या दोन संघांच्या सामन्याने होणार आहे. २०१९ साली झालेल्या अंतिम फेरीत थरारक लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नईवर एका धावेने मात करत विजेतेपद पटकावलं होतं. यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने स्पर्धेचं आयोजन युएईत केलं आहे. मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ मानले जातात. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिकवेळा म्हणजेच ४ तर चेन्नईने ३ वेळा विजेतेपदं पटकावली आहेत. मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्याला सोशल मीडियावरही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात रुप दिलं जातं. दोन्ही संघाचे चाहते या सामन्यादरम्यान सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात आतापर्यंत लढण्यात आलेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचं पारडं जड राहिलेलं आहे. परंतू यंदाची स्पर्धा युएईत होणार असल्यामुळे सर्व संघांना विजयाची समान संधी असल्याचं बोललं जातंय. चेन्नईविरुद्धच्या लढतीआधी मुंबईच्या खेळाडूंच्या काय भावना आहेत हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पाहा काय म्हणतात मुंबई इंडियन्सचे खेळाडू…
: "It's the #ElClasico of @IPL!"#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvCSK pic.twitter.com/i2TV6ump2U
— Mumbai Indians (@mipaltan) September 18, 2020
चॅम्पिअन्स लिगमधील दोन सामने पकडले असता मुंबई आणि चेन्नईचा संघ आतापर्यंत ३० वेळा समोरासमोर आले आहेत. ज्यापैकी १८ सामने मुंबईने जिंकले असून १२ सामने चेन्नईने जिंकले आहेत. आज अबुधाबीच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता दोन्ही संघ समोरासमोर येतील. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.