‘आयपीएल’चा १३ वा हंगामाला आज, शनिवारी सुरुवात होणार आहे. पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. अबू धाबीमधील शेख जायद क्रिकेट स्टेडियममध्ये सलामीचा सामना होणार आहे. येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक मानली जातेय. या मैदानावर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मैदान मोठे असल्यामुळे फलंदाज फिरकीविरुद्ध धोका पत्करण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय आकाश निरभ्र राहणार असून तापमान ३५ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीषण गर्मी आणि उकाडा असेल. त्यामुळे दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ निवडताना विचार करावा लागले. आज होणाऱ्या हायहोल्टेज सामन्यात आपला संघ संतुलीत राहावा असे धोनी आणि रोहित यांनी विचार केला असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गतविजेता मुंबईचा संघ यंदाही संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघांत अनुभवी आणि युवा खेळाडूंचा योग्य भरणा असल्यानेच त्यांनी चार वेळा ‘आयपीएल’चे विजेतेपद मिळवले आहे. मुंबईच्या लसिथ मलिंगाने माघार घेतली असली तरी जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅक्लेनेघन असे वेगवान त्रिकूट त्यांच्याकडे उपलब्ध आहे. कृणाल आणि हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड यांच्या रूपात मुंबईकडे गुणवान अष्टपैलूसुद्धा आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ख्रिस लीनला संघात सहभागी करून मुंबईने फलंदाजीची बाजू अधिक बळकट केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीसाठी ही ‘आयपीएल’ नक्कीच खास असेल. आतापर्यंतच्या १२ हंगामात धोनीच्याच नेतृत्वाखाली चेन्नईने सर्वाधिक आठ वेळा अंतिम फेरी गाठली. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या माघारीमुळे चेन्नईला निश्चितपणे फटका पडला असून यंदा त्यांच्यापुढे नव्याने संघबांधणीचे आव्हान असेल. परंतु अमिरातीतील खेळपट्टय़ांवर फिरकीच्या बळावर सामने जिंकवून देण्यासाठी चेन्नईकडे इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा, पीयूष चावला असे अनुभवी गोलंदाज उपलब्ध आहेत. फलंदाजीत शेन वॉटसन, अंबाती रायुडू, धोनी चेन्नईला तारतील तर ड्वेन ब्राव्हो नेहमीप्रमाणे अष्टपैलू खेळाडूची भूमिका समर्थपणे सांभाळेल.

असा असेल मुंबईचा संघ ? 

रोहित शर्मा(कर्णधार), क्विंटन डिकॉक(विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नाथन कुल्टर नाइल, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट

हे असतील चेन्नईचे किंग्ज?

शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डुप्लेसिस, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जाड़ेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, पीयुष चावला, दीपक चाहर आणि इम्नान ताहिर

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 mumbai indians vs chennai super kings probable playing xi nck