अन्वय सावंत

मुंबई : टी. नटराजन (३/१०) आणि मार्को यान्सेन (३/२५) या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे सनरायजर्स हैदराबादने शनिवारी ‘आयपीएल’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा नऊ गडी आणि ७२ चेंडू राखून धुव्वा उडवला. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील या सामन्यात बंगळूरुचा डाव अवघ्या ६८ धावांत आटोपला. यंदा कोणत्याही संघाची ही निचांकी धावसंख्या ठरली. मग हैदराबादने ६९ धावांचे माफक लक्ष्य अवघ्या आठ षटकांत गाठत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. त्यांचा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्माने (२८ चेंडूंत ४७ धावा) वेगवान खेळी केली.   

तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळूरुची हैदराबादच्या भेदक आणि वैविध्यपूर्ण माऱ्यापुढे दाणादाण उडाली. आफ्रिकेचा उंचपुरा वेगवान गोलंदाज यान्सेनने वैयक्तिक पहिल्या आणि डावाच्या दुसऱ्या षटकात बंगळूरुचा कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिस (५), विराट कोहली (०) व अनुज रावत (०) या त्रिकुटाला माघारी धाडले. यातून बंगळूरुचा संघ सावरू शकला नाही. ग्लेन मॅक्सवेलला (१२) नटराजनने बाद केले, तर दिनेश कार्तिक (०) यंदा पहिल्यांदाच अपयशी ठरला. अखेर बंगळूरुचा डाव ६८ धावांत आटोपला. गोलंदाजीत यान्सेन आणि नटराजनला जगदीश सुचित (२/१२), भुवनेश्वर कुमार (१/८), उमरान मलिक (१/१३) यांची उत्तम साथ लाभली.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : १६.१ षटकांत सर्वबाद ६८ (सुयश प्रभूदेसाई १५; टी. नटराजन ३/१०, मार्को यान्सेन ३/२५) पराभूत वि. सनरायजर्स हैदराबाद : ८ षटकांत १ बाद ७२ (अभिषेक शर्मा ४७; हर्षल पटेल १/१८)

बंगळूरुचा विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर खातेही न उघडता बाद झाला.

Story img Loader