बुधवारी रात्री केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २ धावांनी पराभव केला. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला. लखनऊच्या या विजयात रिंकू सिंह संघासाठी अडसर ठरत होता. पण एव्हिन लुईसने आपल्या शानदार क्षेत्ररक्षणातून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या तोंडून सामना हिसकावून घेतला. लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना केकेआरसमोर २११ धावांचे लक्ष्य ठेवले होते, कोलकाताला निर्धारित २० षटकात २०८ धावाच करता आल्या.
एविन लुईसच्या झेलने फिरला सामना
कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या षटकात २१ धावांची गरज होती. यादरम्यान चेंडू मार्कस स्टॉइनिसच्या हातात होता, तर रिंकू सिंह स्ट्राईकवर फलंदाजी करत होता. स्टाइनिनच्या पहिल्या चेंडूवर रिंकूने चौकार मारला आणि पुढच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. रिंकूची ही झंझावाती फलंदाजी पाहिल्यानंतर लखनऊचे चाहते काही काळ थांबले.
पहिल्या ३ चेंडूत १६ धावा केल्यानंतर कोलकाताला शेवटच्या ३ चेंडूत ५ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर रिंकू सिंह दोन धावा धावला. आता केकेआरला २ चेंडूत ३ धावांची गरज होती आणि या मोसमातील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग पूर्ण करेल असे वाटत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. पाचव्या चेंडूवर रिंकू सिंहला एक्स्ट्रा कव्हरवरून खेळायचे होते, पण त्याने चेंडू हवेत मारला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने उभ्या असलेल्या लुईसने पटकन चेंडूकडे धाव घेतली आणि विरुद्ध हाताने झेल घेतला. लुईसचा हा झेल पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि तो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
लुईसच्या या दमदार झेलनंतर कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. चौकार गेला असते तर कोलकाताने सामना जिंकला असता आणि दोन धावा झाल्या असत्या तर आयपीएल २०२२ ची पहिली सुपर ओव्हर खेळली गेली असती. पण स्टॉइनिसने शेवटच्या चेंडूवर उमेश यादवला यॉर्करवर बोल्ड करून लखनऊ सुपर जायंट्सला दणका दिला.
दरम्यान, लुईसचा नऊ मॅचनंतर लखनऊच्या संघामध्ये समावेश करण्यात आला होता. पण, क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल या ओपनिंग जोडीनं संपूर्ण २० षटके खेळल्याने इतरांना फलंदाजी करता आली नाही. यामुळे लुईसलाही बॅटींग मिळाली नाही. संपूर्ण मॅचमध्ये फार संधी न मिळालेल्या लुईसनं शेवटच्या ओव्हरमध्ये एक कॅच घेत मॅचचं चित्र पालटलं.