आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. चेन्नई सुपर किंग्जने सुरुवात चांगली केली असली तरी फलंदाजी करताना चेन्नईच्या खेळाडूंनी अनेक झेल सोडले. त्याचा फटका चेन्नईला बसला. विशेष म्हणजे अंबाती रायडूने लियाम लिव्हिंगस्टोनचा सोडलेला झेल चेन्नईला चांगला महागात पडला. जिवदान मिळाल्यानंतर लिव्हिंगस्टोनने ६० धावा केल्या. परिणामी पंजाबच्या संघाने १८० धावा केल्या.
अंबाती रायडून सोडला झेल
तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजीसाठी आलेल्या लिव्हिंगस्टोनने धडाकेबाज फलंदाजी केली. मैदानात येताच लियामने मोठे फटके मारायला सुरुवात केली. मात्र ४५ धावांवर असताना रविंद्र जाडेजाने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारताना तो चुकला. चेंडू थेट अंबाती रायडूच्या हातात गेला. मात्र अगदी सोपा असलेला हा झेल अंबाती रायडूने सोडला.
झेल सुटल्यामुळे लिव्हिंगस्टोनला जीवदान मिळाले. त्यानंतर मात्र लियाम चांगलाच तळपला. त्याने चेन्नईच्या गोलंदांना चांगलेच झोडून काढले. मिळालेल्या संधीचा फायदा घेत लिव्हिगस्टोनने ३२ चेंडूंमध्ये पाच षटकार आणि पाच चौकार यांच्या मदतीने ६० धावा केल्या.
विशेष म्हणजे लिव्हिंगस्टोनने मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेत मोठे षटकार लगावले. त्याने या हंगामातील सर्वात लांब म्हणजे १०८ मिटर लांबीचा षटकार लगावला. लियामच्या याच खेळाचा पंजाबला मोठा फायदा झाला.