आयपीएलच्या पंधराव्या हंगामामध्ये सुरशीच्या लढती होत आहेत. या हंगामात आणखी दोन संघांचा समावेश झाल्यामुळे एकूण दहा संघ एकमेकांशी दोन हात करत आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात काल अटीतटीची लढत झाली. हा सामना शेवटच्या षकटापर्यंत गेल्यामुळे दोन संघामध्ये नेमकं कोण विजयी होणार हे सांगणं अवघड झालं होतं. मात्र १९ व्या षटकात कोलकाताने घातलेल्या गोंधळामुळे हा सामना बंगळुरुच्या खात्यात गेला.
१९ व्या षटकात नेमकं काय झालं ?
कोलकाताने दिलेले १२८ धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरूची पुरती धांदल उडाली. १९ व्या षटकात बंगळुरुची ११३ धावांवर सात गडी बाद अशी स्थिती झाली होती. विजयासाठी बंगळुरुला ११ चेंडूंमध्ये १६ धावांची गरज होती. तर दोन्ही संघांवर दबाव वाढलेला असताना कोलकाताला सामन्यावर वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली होती. बंगळुरुकडून दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल ही जोडी फलंदाजी करत होती. यावेळी दिनेशने मोठा फटका मारून चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्याने दिनेश कार्तिक गोंधळला. त्यानंतर दिनेश कार्तिकने ऐनवेळी माघार घेतली. त्याने हर्षल पटेला धाव घेण्यास मनाई केली. मात्र तोपर्यंत हर्षल पटेल दिनेश कार्तिकजवळ येऊन पोहोचला होता.
केकेआरचा क्षेत्ररक्षक गोंधळला आणि कार्तिकला मिळाले जीवदान
दोन्ही खेळाडू एकाच बाजूला आल्यामुळे कार्तिकला बाद करण्याची नामी संधी कोलकाताकडे होती. मात्र कोलकाताचा क्षेत्ररक्षकही गोंधळल्याने त्याला चेंडू नेमक कोठे फेकावा हे समजले नाही. याच संधीचा फायदा घेत दिनेश कार्तिक नॉन स्ट्रायकर एंडवर पोहोचला. चेंडू स्टंपला मारण्याचा प्रयत्न करताना केकेआरचा खेळाडू गोंधळल्यामुळे दिनेश कार्तिकला जीवदान मिळाले. त्यानंतर मात्र दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात षटकार लगावून कोलकाताला धूळ चारली.
…तर चित्र वेगळे असते
कोलकाताच्या क्षेत्ररक्षकाने चूक न करता दिनेश कार्तिकला धावबाद करण्याची संधी गमावली नसती तर कदाचित चित्र वेगळे असते. सामना केकेआरला जिंकता आला असता. मात्र या एका चुकीमुळे दिनेश कार्तिकला जीवदान मिळाले आणि त्याने बंगळुरुला सामना जिंकून दिला.