आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला धूळ चारली आहे. दिल्लीने चार गडी राखून दणदणीत विजय मिळवला असून मुंबईने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य दिल्लीने लिलया पेलले आहे. अक्षर पटेल आणि ललित यादव या जोडीने या विजयासाठी मोठी मेहनत घेतली.
दिल्लीची झाली होती दयनीय अवस्था
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी दिमाखदार कामगिरी करत दिल्लीसमोर १७८ धावांचे लक्ष्य उभे केले. या धवांचा पाठलाग उतरण्यासाठी उतरलेले दिल्लीचे फलंदाज मात्र चांगली कामगिरी करु शकले नाही. पृथ्वी शॉ आणइ टीम सेफर्ट सलामीला मैदानात उतरले. मात्र दिल्लीच्या अवघ्या ३० धावा असताना टीम बाद झाला. त्यानंतर लगेचच मनदीप सिंगही शून्यावर तंबूत परतला. पुढे दोन धावा केल्यानंतर दिल्लीचा ऋषभ पंतच्या रुपात आणखी एक फलंदाज बाद झाला. सलग तीन गडी बाद झाल्यानंतर दिल्लीची ३२ धावांवर तीन गडी बाद अशी दयनीय अवस्था झाली होती.
पॉवेलने केली निराशा, शून्यावर बाद
त्यानंतर मात्र पृथ्वी शॉने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने २४ चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोष षटकार लगावत ३८ धावा केल्या. पाचव्या विकेटसाठी आलेल्या रॉवमन पॉवेलने मात्र पूर्णपणे निराशा केली. तो शून्यावर बाद झाल्याचा दिल्लीला मोठा फटका बसला. शार्दुल ठाकुरही चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याने ११ चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीने २२ धावा केल्या. शार्दुल पहिल्यापासून आक्रमकपणे खेळत होता. मात्र तोच आक्रमकपणे पुढे त्याला भोवला. तो झेलबाद झाला. शार्दुल बाद झाल्यानंतर मात्र अक्षर पटेल आणि ललित यादव या जोडगोळीने संघाला तारलं. सामना हातातून जाण्याची शक्यता असताना या जोडीने चांगला खेळ केला आणि दिल्लीला विजय मिळवून दिला.
याआधी दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंर मुंबई इंडियन्सतर्फे कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन फलंदाजी करण्यासाठी उतरले. सुरुवाीला दोघेही सावध होऊन खेळत होते. मात्र मुंबई ६७ धावांवर असताना रोहित शर्मा बाद झाला. त्याने ३२ चेंडूंमध्ये चार चौकार आणि दोन षटकारांच्या जोराववर ४१ धावा केल्या. त्यानंतर अनमोलप्रित फलंदाजीसाठी आला. मात्र तो मैदानावर आपली जादू दाखवू शकला नाही. अवघ्या आठ धावा करत तो तंबूत परतला.
ईशान किशनने दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम
त्यानंतर मुंबईच्या ११३ धावा असताना तिलक वर्मा तर १२२ धावा असताना किरॉन पोलार्ड बाद झाला. पोलार्डने अवघ्या तीन धावा केल्या. तर तिलक वर्माने १५ चेंडूंमध्ये तीन चौकारांच्या मदतीने २२ धावा केल्या. ईशान किशनने रोहित शर्मासोतब येऊन सलामीसाठी येऊन शेवटपर्यंत मैदानात पाय घट्ट रोवले. ईशान किशनने ४८ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. किशनच्या या धावसंख्येमुळे मुंबईला १७७ धावांपर्यंत मजल मारता आली.
पूर्ण डावामध्ये मुंबईचे फक्त ५ गडी बाद
गोलंदाजबद्दल बोलायचं झालं तर दिल्ली कॅपीटल्सला पूर्ण डावामध्ये मुंबईचे फक्त ५ गडी बाद करता आले. कुलदीप यादवने चार षटकांमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, अमरप्रित सिंह, आणि पोलार्ड यांना बाद करुण्याची किमया केली. तर खलील अहमदने तिलक वर्मा आणि टीम डेविड अशा दोन खेळाडूंना बाद केले.