आयपीएल २०२२ चा पंधरावा सिझन महाराष्ट्रातील चार ठिकाणी आयोजित केला जात आहे. यामध्ये वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमचा समावेश आहे. त्यामुळे इतर अनेक फ्रँचायझींनी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला फायदा होणार असल्याची चिंता व्यक्त केली होती. त्यावर आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणाऱ्या रोहित शर्माने प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर चार सामने खेळायला मिळणार आहेत. तर इतर कोणत्याही फ्रँचायझींना इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या लीमध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळायला मिळणार नाही. त्यामुळे इतर संघाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर रोहित शर्माने इतर संघांच्या फ्रँचायझींना सल्ला दिला आहे.
रोहित शर्माने आयपीएल २०२२ च्या सुरुवातीच्या अगोदर सांगितले होते की हे सर्व फ्रँचायझींसाठी हे एक समान खेळाचे क्षेत्र आहे. मुंबईकडे मोजकेच खेळाडू आहेत जे यापूर्वी वानखेडे स्टेडियम किंवा ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळले आहेत.
“गेल्या दोन वर्षांत आम्ही मुंबईत एकही खेळ खेळला नसल्यामुळे आम्हाला घरच्या मैदानाचा फायदा नाही. गेल्या वर्षी मुंबईत अनेक संघ सामने खेळले. त्यामुळे आम्हाला फायदा नाही. यावेळी एक नवीन संघ आहे आणि मी या अतिरिक्त फायद्यावर विश्वास ठेवत नाही. तसेच ७० ते ८० टक्के संघ यापूर्वी मुंबईत खेळलेला नाही,” असे रोहित शर्माने म्हटले होते.
घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सला खेळायला मिळत असल्याबद्दल इतर फ्रँचायझींच्या तक्रारीवर रोहित शर्माने उत्तर दिले आहे. इतर फ्रँचायझींनी इंडियन प्रीमियर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलकडे आणि बीसीसीआयकडे मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे आयोजन त्यांच्या घरच्या मैदानावर होत असल्याची तक्रार केली होती. कर्णधार रोहित शर्माने एका कार्यक्रमात उत्तर दिले.
“अनेक फ्रँचायझींनी म्हटले आहे की एमआयला मुंबईत खेळू देऊ नये. त्यामुळे त्यावर माझे मत असे आहे की ज्या फ्रँचायझींना आक्षेप आहे त्यांनी त्यांच्या शहरात प्रत्येकी ३-४ मैदाने बांधावीत,” असे रोहित शर्माने म्हटले.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या खात्यावर पाच जेतेपदे आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सकडे एकही नाही. परंतु मुंबई, दिल्ली या दोन्ही संघांमध्ये अनेक विजयवीर खेळाडू आहेत. त्यामुळेच रविवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या लढतीत विजयी अभियानासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.
मुंबईने कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, किरॉन पोलार्ड आणि वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा या प्रमुख फळीला कायम राखले आहे. याच चौघांच्या कामगिरीवर मुंबईची भिस्त असेल. लिलावात १५.२५ कोटी रुपयांची बोली लागलेल्या इशानसोबत सलामी करणार आहे, हे रोहितने आधीच स्पष्ट केले आहे.