आयपीएल २०२२ च्या ३४ व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या १५ व्या हंगामात सहा पैकी चार सामने जिंकले असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स तितक्याच सामन्यांमध्ये तीन सामने जिंकून सहाव्या स्थानावर आहे. एक सामना हरल्याने दिल्ली आणि राजस्थान यांच्यात दोन स्थानांचे अंतर निर्माण झाले आहे. अशा स्थितीत आज दिल्ली आणि राजस्थानला त्यांच्या मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरायचे आहे. करोनाच्या छायेत खेळणाऱ्या दिल्लीला दुहेरी फटका बसला आहे. दिल्ली गेल्या सामन्यात तीन परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरली होती. अशा परिस्थितीत आज होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दिल्ली कॅपिटल्ससाठी हंगामाची सुरुवात चांगली झाली. या संघाने पहिल्या सामन्यात मुंबईचा चार गडी राखून पराभव केला होता. पुढच्या सामन्यात गुजरात संघाचा १४ धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यात संघाला लखनऊकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पुढच्या सामन्यात संघाने कोलकातावर ४४ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. मात्र त्यानंतर पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने दिल्लीचा १६ धावांनी पराभव केला. मात्र, सहाव्या सामन्यात संघाने शानदार पुनरागमन करत पंजाब किंग्जचा एकतर्फी सामन्यात नऊ गडी राखून पराभव केला.
दिल्लीच्या संघात डेव्हिड वॉर्नरच्या आगमनानंतर संघाची फलंदाजी चांगलीच भक्कम झाली आहे. वॉर्नरने गेल्या तीन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. पृथ्वी शॉनेही त्याला चांगली साथ दिली आहे. मात्र या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला सातत्य दाखवता आलेले नाही. मार्श कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर संघाची मधली फळी कमकुवत झाल्याचे दिसत आहे. उर्वरित सामन्यांमध्ये कर्णधार पंत व्यतिरिक्त ललित यादव आणि रोवमन पॉवेल यांच्याकडून संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
या दोन्ही संघांशी संबंधित एक किस्सा आजच्यात दिवशी घडला होता. २२ एप्रिल २०१९ रोजी आयपीएलच्या १२ व्या हंगामातील ४० व्या सामन्यात दिल्ली आणि राजस्थान आमनेसामने होते. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानने २० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावा केल्या. रहाणेने १०५ धावांची शानदार शतकी खेळी खेळली होती.
प्रत्युत्तरात दिल्लीची सुरुवात चांगली झाली होती. शॉ आणि धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. पण आधी धवन आणि लगेचच अय्यरही पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर क्रीजवर आलेल्या ऋषभ पंतने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि पृथ्वी शॉच्या साथीने संघाला विजयाच्या जवळ नेले. दोघांनी अवघ्या ४७ चेंडूत ८४ धावांची भागीदारी केली. शॉ बाद झाल्यानंतरही पंतने फलंदाजी सुरूच ठेवली आणि चार चेंडू शिल्लक असताना संघाने सहा गडी राखून विजय मिळवला. पंत ३६ चेंडूत ७८ धावा करून नाबाद राहिला.
मात्र यंदाच्या मोसमात पंतला अद्याप तो फॉर्म सापडलेला नाही. पंत या महत्त्वाच्या सामन्यात त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करून आपल्या संघाला विजय मिळवून देईल, अशी आशा दिल्लीच्या चाहत्यांना असणार आहे.