आयपीएलच्या १५ व्या हंगामात पहिल्याच सामन्यात पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवला होता. या दणदणीत विजय मिळवल्यामुळे पंजाब किंग्ज संघाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. दरम्यान, पंजाबच्या ताफ्यात जॉनी बेअरस्टो हा दिग्गज फलंदाज आल्यामुळे या संघाची ताकत आणखी वाढणार आहे.
जॉनी बेअरस्टो संघात सामील झाल्याची माहिती पंजाब किंग्जने दिली आहे. जॉनी बेअरस्टो हा मूळचा इंग्लंडचा खेळाडू असून त्याला आयपीएल पंधराव्या हंगामासाठी पंजाब किंग्जने ६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मात्र आयपीएल सुरु होण्यापूर्वी बेअरस्टो वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर होता. वेस्ट इंडिजमधील कसोटी सामने संपताच बेअरस्टो आता पंजाबच्या ताफ्यात सामील झालाय. बेअरस्टो हा फलंदाज असून यष्टीकक्षकदेखील आहे. त्याच्या येण्याने आता पंजाबचा संघ आणखी मजूबत होणार आहे.
दरम्यान पंजाब किंग्जचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सविरोधात येत्या १ एप्रिल रोजी होणार आहे. मात्र बेअरस्टो हा सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण करोना प्रतिबंधक उपाय आणि नियमांच्या अंतर्गत त्याला काही दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर तो संघामध्ये सामील होऊन मैदानावर खेळण्यासाठी उतरु शकतो.