आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील बंगळुरु आणि कोलकाता यांच्यातील सामना चांगलाच रंगला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेल्यामुळे दोन्ही संघांनी श्वास रोखून धरला होता. कोणाचं पारडं जड भरणार हे शेवटच्या षटकापर्यंत स्पष्ट झालं नव्हतं. दरम्यान, दिनेश कार्तिकने शेवटच्या क्षणी बहारदार खेळ केल्यामुळे बंगळुरु संघ विजय संपादन करु शकला. कार्तिकच्या याच कामगिरीची बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने दखल घेतली आहे. त्याने कार्तिकची महेंद्रसिंह धोनीशी तुलना केलीय.
दिनेश कार्तिकने शेवटच्या क्षणी संघाला तारलं
कोलकाता आणि बंगळुरु यांच्यात काल झालेल्या सामन्यात अटीतटीची लढत झाली. हा समाना शेवटच्या षटकापर्यंत गेल्यामुळे कोणाचा विजय होणार हे सांगणे कठीण होऊन बसले होते. मात्र शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने चांगला खेळ केल्यामुळे बंगळुरुचा विजय झाला. शेवटच्या षटकामध्ये सहा चेंडूमध्ये सात धावांची गरज होती. त्यानंतर शेवटच्या षटकात दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला. त्याने पहिल्याच चेंडूमध्ये जोराचा फटका मारत षटकार लगावला आणि दुसऱ्याच चेंडूमध्ये सामना बंगळुरुच्या नावावर केला.
त्याच्या याच खेळाचं बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने कौतूक केले आहे. त्याने कार्तिकची तुलना धोनीशी केली आहे. “हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जायला नको होता. आम्ही लवकर सामना जिंकायला हवा होता. कोलकाताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. तर आम्हाला दिनेश कार्तिकचा अनुभव कामी आला. दिनेश कार्तिकदेखील शेवटी महेंद्रसिंह सारखाच कुल असतो,” असं फाफ डू प्लेसिसने म्हटलंय. तस दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या ट्विटर अकाऊंटवर कार्तिकला फिनिशर म्हटलंय.