आयपीएल २०० च्या (IPL 2022) ३५ व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करायला मैदानात उतरलेल्या गुजरात टाइटन्सने २० षटकात ९ बाद १५६ धावा केल्या. यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे पांड्याने या अर्धशतकासह अर्धशतकांची हॅट्रिक केलीय. आता कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी १५७ धावांची गरज असेल.
गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. त्यांना दुसऱ्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलच्या रुपात पहिला झटका लागला. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने बाजू सांभाळली. पांड्याचा शानदार फॉर्म कायम राहिला. त्यामुळेच सुरुवातीलाच विकेट जाऊनही गुजरातच्या धावांवर परिणाम झाला नाही.
हार्दिक पांड्याकडून ३६ चेंडूत अर्धशतक
ऋद्धिमान साहाने पांड्याची सोबत दिली. मात्र, वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात साहा बाद झाला. त्याने २५ चेंडूत २५ धावा केल्या. तो ११ व्या षटकात बाद झाला. यावेळी गुजरातची धावसंख्या ८३ होती. दरम्यान, हार्दिक पांड्याने ३६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे पांड्याचं सलग तिसरं अर्धशतक आहे.
डेविड मिलरने देखील हार्दिकला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून अर्धशतकी भागिदारी केली. मात्र, १७ व्या षटकात मावीने ही भागिदारी तोडली. मिलरने २० चेंडूत २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. यानंतर पुढच्याच षटकात टिम साऊदीने आधी हार्दिक पांड्या (४९ चेंडूत ६७ धावा, ४ चौकार आणि २ षटकार) आणि राशिद खान (०) अशा दोन विकेट घेतल्या.
आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात घेतल्या ४ विकेट
अखेरच्या ५ षटकात गुजरातच्या संघाने केवळ २९ धावा केल्या आणि ७ विकेट गमावल्या. विशेष म्हणजे अखेरच्या षटकात आंद्रे रसेलने गुजरात टाइटन्सच्या ४ खेळाडूंना तंबूत पाठवलं. त्यामुळेच गुजरातला २० षटकात ९ बाद केवळ १५६ धावाच करता आल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ४ विकेट, टिम साऊदीने ३, उमेश यादव आणि शिवम मावीने प्रत्येकी एक विकेट घेतली.