लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नेहमीप्रमाणेच यावेळीही आयपीएलमध्ये वादळ निर्माण केले आहे. रविवारी केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार खेळी केली. यादरम्यान, त्याने पहिला षटकार मारताच, तो आयपीएलमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान १५० षटकार मारणारा फलंदाज बनला. आयपीएलच्या या मोसमात केएल राहुल लयीत दिसत आहे. काही सामने वगळता त्याने सातत्याने धावा केल्या आहेत.
केएल राहुलने ३५ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे २९ वे अर्धशतक आहे. केएल राहुलचे आयपीएल २०२२ मधील हे तिसरे अर्धशतक आहे. या मोसमात त्याने दोन शतकेही झळकावली आहेत. कर्णधार केएल राहुलने आयपीएल २०२२ मध्ये ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. केएल राहुल या मोसमात दोनदा खातेही न उघडता बाद झाला आहे.
आयपीएलच्या इतिहासात भारताकडून सर्वात जलद १५० षटकार ठोकण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर आहे. संजू सॅमसनने आयपीएलमध्ये १२५ सामन्यात १५० षटकार ठोकले होते. त्याचबरोबर केएल राहुलने १०० पेक्षा कमी सामन्यात हा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने १२९ सामन्यात आणि विराट कोहलीने १३२ डावांत १५० षटकार मारण्याचा करिष्मा केला आहे. मात्र, सर्वात वेगवान १५० षटकारांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे. लखनऊने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने २० षटकांत तीन बाद १९५ धावा केल्या. दिल्लीला १९६ धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी अर्धशतके ठोकली. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने तिन्ही विकेट घेतल्या.
क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी लखनौला वेगवान सुरुवात करून दिली. शार्दुल ठाकूरने पाचव्या षटकात डी कॉकला बाद करून संघाला पहिला धक्का दिला. त्याने १५ व्या षटकात दीपक हुडाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. १९व्या षटकात शार्दूलने केएल राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवत लखनऊला तिसरा धक्का दिला. मार्क्स स्टॉइनिस १७ आणि कृणाल पंड्या नऊ धावा करून नाबाद राहिले.