लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२ च्या ३७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव करून मोसमातील आपला पाचवा विजय नोंदवला. मात्र, या विजयानंतरही लखनऊच्या संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआय आणि आयपीएल आयोजकांनी लखनऊ सुपर जायंट्स आणि त्याचा कर्णधार केएल राहुलला सामन्यात निर्धारित वेळेपेक्षा कमी गोलंदाजी केल्याबद्दल (स्लो ओव्हर रेट) दंड ठोठावला आहे. लखनऊ आणि मुंबई यांच्यातील हा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.

लखनऊ सुपर जायंट्सचा या मोसमातील स्लो ओव्हर रेटबाबची ही दुसरी वेळ होती. यासाठी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला २४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे तर प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंना प्रत्येकी सहा लाख रुपये किंवा मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या मोसमात दुसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आल्यानंतर राहुलवर आता बंदी घालण्यात येण्याचा धोका आहे. राहुलने या सामन्यात १०३ धावांची नाबाद शतकी खेळी केली.

लखनऊ सुपर जायंट्स संघाला यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आयपीएलच्या २६व्या सामन्यानंतरच दंड ठोठावण्यात आला होता. त्या सामन्यातही स्लो ओव्हर रेटसाठी राहुलला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. आयपीएल २०२२ च्या मोसमात लखनऊने पहिल्यांदाच हा गुन्हा केला होता, त्यामुळे राहुलला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. पण आता राहुलला ३७ व्या सामन्यात दुसऱ्यांदा आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सने तिसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास कर्णधार राहुलला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल आणि आयपीएलच्या अधिकृत नियमांनुसार एका सामन्यासाठी बंदी घातली जाईल. नियमांनुसार तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला ३० लाख आणि संघाच्या पुढील लीग सामन्यात खेळण्यास बंदी जाते.

Story img Loader