आयपीएलच्या १५व्या मोसमापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. पण १५ व्या मोसमात मुंबई इंडियन्सची अवस्था इतकी वाईट झाली आहे, जी यापूर्वी कधीच नव्हती. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ मध्ये त्यांचे आठही सामने गमावले आहेत आणि संघ स्पर्धेतील प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. सलग आठ पराभवांनंतर आता मुंबई इंडियन्सच्या नावावर एक अतिशय लाजिरवाणा विक्रमही जमा झाला आहे.

रविवारी मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंट्सकडून ३६ धावांनी पराभव झाला. या मोसमातील पहिल्या आठ सामन्यांमधला मुंबईचा हा सलग आठवा पराभव आहे. या पराभवासह आयपीएलमध्ये मुंबईच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची भर पडली आहे. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने पहिले आठ सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर, आयपीएलच्या इतिहासात मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश येण्याची ही सहावी वेळ आहे. यापूर्वी २००८, २००९, २०१६, २०१८ आणि २०२१ मध्ये मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही.

बाबर आझमसोबत का होतेय तुलना?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाला सलग आठ सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ मध्ये सलग आठ सामने गमावले आहेत. रोहितने सलग आठ सामने गमावल्यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पाकिस्तानच्या कर्णधारानेही सलग आठ सामने गमावले आहेत. बाबरच्या नेतृत्वाखाली, कराची किंग्जला या वर्षी पाकिस्तान सुपर लीग मध्ये सलग आठ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला रविवारी लखनऊ सुपर जायंट्सकडून ३६ धावांनी पराभव पत्करावा लागला. कर्णधार लोकेश राहुलच्या नाबाद १०३ धावांच्या जोरावर लखनऊने गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला ८ बाद १३२ धावांवर रोखले. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला. कोणताही फलंदाज जबाबदारी घेण्यास तयार नाही, असे रोहितने म्हटले आहे.

Story img Loader