आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना आज नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जातोय. आजचा हा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याच रंगला आहे. दरम्यान, फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या फळीतील फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर तर चांगलाच तळपला असून त्याने मैदानावर धावांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. त्याने ६८ चेडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आहे. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे राजस्थान संघ मोठी धावसंख्या उभी करु शकला.

नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचे जोस बटलर आणि यशस्वी जैसवाल सलामीला उतरले. जैसवालने निराशाजनक कामगिरी केली. मात्र बटलरने सुरुवातीलासून जोरदार फटकेबाजी करत राजस्थानचा धावफलक धावता ठेवला. त्याने चौथ्या षटकात बसल थंम्पीला चांगलेच झोडून काढले. बटलरने या षटकात दुसऱ्या चेंडूमध्ये एक चौकार लगावला. तर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूमध्ये षटकार लगावत मुंबई संघाला घाम फोडला. बटलर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पुढच्या दोन चेंडूमध्ये चौकार आणि षटकार झोडत तब्बल २६ धावा केल्या.

या धडाकेबाज खेळीमुळे मुंबई संघ चांगलाच भेदरला. त्यानंतर यशस्वी जैसवाल आणि देवदत्त पडिक्कल हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने बटलरला साथ दिली. संजूने २१ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. तर संजू बटलरने ६८ चेंडूंमध्ये पाच षटकार आणि तब्बल ११ चौकार यांच्या मदतीने १०० धावा पूर्ण केल्या.