रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२ मध्ये पहिला विजय मिळाला आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या रोहमहर्षक सामन्यात मुंबईने पाच विकेट राखून राजस्थानचा पराभव केला आहे. आयपीएलच्या १५ व्या मोसमात सलग आठ सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सला हा विजय मिळाला आहे.

बर्थडे बॉय रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर १५८ धावा केल्या. मुंबईने १५९ धावांचे लक्ष्य १९.२ षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दोन तर इशान किशनने २६ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादव ५१ धावा करून बाद झाला. दोन चेंडूंनंतर, तिलक वर्मा ३५ धावा करुन बाद झाला. तर किरॉन पोलार्ड १० धावा करून बाद झाला. टीम डेव्हिड २० आणि सॅम्स सहा धावा करून नाबाद परतले.

राजस्थान रॉयल्सचेकडून पडिक्कल (१५) आणि सॅमसन (१६) धावा करून झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर बटलरने मिशेल (१७) सोबत डाव सांभाळला. बटलरने ४८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने हृतिकच्या षटकात सलग चार षटकार मारून आपला स्ट्राईक रेट वाढवला. बटलरने ५२ चेंडूत ६७ धावा केल्या. शेवटी अश्विनने नऊ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावांची तुफानी खेळी करत संघाला १५० च्या पुढे नेले. मुंबईकडून हृतिक आणि मेरेडिथने प्रत्येकी २ बळी घेतले

Live Updates
23:43 (IST) 30 Apr 2022
अखेर मुंबईला विजय मिळाला

शेवटच्या षटकात विजयासाठी ४ धावांची गरज होती. कुलदीप सेनच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्ड बाद झाला. त्यानंतर डॅनियल सॅम्स नवा फलंदाज म्हणून आला. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारत मुंबईने मोसमातील पहिला विजय नोंदवला. राजस्थानचा पाच गडी राखून पराभव झाला. सलग आठ सामने गमावल्यानंतर संघाने विजय मिळवला आहे

23:29 (IST) 30 Apr 2022
तिलक वर्मा बाद

राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सलग दोन विकेट्स घेत दमदार पुनरागमन केले. तीन चेंडूंतच राजस्थानने सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोन फलंदाजांना बाद केले. टिळक वर्माने ३० चेंडूत ३५ धावा केल्या आणि प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर रियान परागने त्याचा झेल घेतला.

23:06 (IST) 30 Apr 2022
मुंबईला तिसरा धक्का

१५ षटकांचा खेळ संपल्यानंतर मुंबईची तिसरी विकेट पडली. युझवेंद्र चहलने सूर्यकुमार यादवला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

23:01 (IST) 30 Apr 2022
सूर्यकुमार यादवचे अर्धशतक

या सामन्यात सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने जबरदस्त खेळ दाखवला. सूर्यकुमारे ३६ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले

22:07 (IST) 30 Apr 2022
मुंबईला दुसरा धक्का

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात आलेल्या ट्रेंट बोल्डने चौथ्या चेंडूवर ईशान किशनला बाउन्सरवर बाद केले. किशन आज रंगात दिसला आणि १८ चेंडूत २६ धावा करून बाद झाला.

21:54 (IST) 30 Apr 2022
रविचंद्रन अश्विनने रोहित शर्माला पाठवले पॅव्हेलियनमध्ये

मुंबईला पहिला धक्का बसला आहे. रविचंद्रन अश्विनने रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहित शर्माने दोन धावा केल्या.

21:44 (IST) 30 Apr 2022
इशान किशनने षटकार लगावत खाते उघडले

ट्रेंड बोल्टच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशान किशनने थर्ड मॅनच्या दिशेने षटकार खेचून आपले खाते उघडले. आज किशन फटकेबाजीच्या मूडने मैदानात उतरला आहे.

21:28 (IST) 30 Apr 2022
मुंबईला विजयासाठी १५९ धावांची गरज

राजस्थानने २० षटकांत सहा बाद १५८ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला विजयासाठी १५९ धावांची गरज आहे.

21:21 (IST) 30 Apr 2022
अश्विन झंझावाती खेळी खेळून बाद

डावातील शेवटचे षटक घेऊन आलेल्या मेरेडिथने पहिल्याच चेंडूवर अश्विनला बाद केले. नऊ चेंडूत २१ धावा करून तो बाद झाला. अश्विनच्या या धावा राजस्थानसाठी खूप महत्त्वाच्या ठरतील.

21:08 (IST) 30 Apr 2022
बटलरपाठोपाठ रियान परागही बाद

रिले मेरेडिथने रियान परागला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. परागने तीन धावा केल्या. संघाने १७.४ षटकात पाच विकेट गमावत १३६ धावा केल्या.

21:02 (IST) 30 Apr 2022
सलग चार षटकार मारून पॅव्हेलियनमध्ये परतला बटलर

हृतिकच्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर चार षटकार मारल्यानंतर शेवटच्या चेंडूवर बटलर बाद झाला. बटलरने ५२ चेंडूत ६७ धावांची खेळी खेळली.

20:57 (IST) 30 Apr 2022
बटलरचे ४८ चेंडूत अर्धशतक

१६ व्या षटकात आलेल्या हृतिक शोकीनच्या पहिल्या तीन चेंडूत षटकारांची हॅट्ट्रिक मारून बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले.

20:52 (IST) 30 Apr 2022
राजस्थानला तिसरा धक्का बसला

मुंबईच्या डॅनियल सॅम्सने डॅरिल मिशेलला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. मिशेलने २० चेंडूत १७ धावा केल्या.

20:16 (IST) 30 Apr 2022
कार्तिकेयने संजू सॅमसनला पाठवले पॅव्हेलियनमध्ये

कुमार कार्तिकेयने संजू सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. संजू सॅमसनने १६ धावा केल्या.

20:03 (IST) 30 Apr 2022
बटलरच्या हेल्मेटला लागला चेंडू

पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकणाऱ्या रिले मेरेडिथचा पाचवा चेंडू बटलरच्या हेल्मेटला लागला. या चेंडूचा वेग सुमारे १४० किमी प्रतितास इतका होता. यावेळी फिजिओ मैदानावर उतरले आणि खेळ काही काळ थांबण्यात आला होता

19:59 (IST) 30 Apr 2022
राजस्थानला पहिला धक्का; देवदत्त पडिक्कलला १५ धावांवर बाद

राजस्थानला पहिला धक्का हृतिक शोकिनने दिला. त्याने देवदत्त पडिक्कलला १५ धावांवर बाद केले. पडिक्कल हृतिक शोकीनच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा शॉट खेळायला गेला आणि लाँग ऑफवर पोलार्डकडे चेंडू गेल्याने झेलबाद झाला.

19:18 (IST) 30 Apr 2022
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन)

जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (क), डॅरिल मिशेल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन

19:17 (IST) 30 Apr 2022
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन)

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (क), टिम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ

19:17 (IST) 30 Apr 2022
मुंबई इंडियन्सनचा पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संघात दोन बदल करण्यात आले आहेत. डेवाल्ड ब्रेविस आणि जयदेव उनाडकटच्या जागी टीम डेव्हिड आणि कुमार कार्तिकेयला संधी मिळाली. राजस्थान संघात कोणताही बदल झालेला नाही.

Story img Loader