आयपीएल २०२२ च्या ४४व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. या सामन्यात राजस्थानने मुंबईला १५९ धावांचे लक्ष्य दिले होते. मुंबईने हे लक्ष्य चार चेंडू बाकी असताना पूर्ण केले. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारने ५१ धावांची खेळी खेळली. मात्र, सामन्यादरम्यान सूर्यकुमार आणि युझवेंद्र चहल यांच्यात रोचक लढत झाली. एकदा चहलने सूर्यकुमारला आपल्या फिरकीत अडकवले होते. मात्र पंचाच्या निर्णयामुळे सूर्यकुमार बचावला आणि चहल निराश झाला. मात्र, यानंतर सूर्यकुमारने चहलला गाठून मिठी मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सचा हिरो ठरलेल्या सूर्यकुमार यादवने जबरदस्त अर्धशतक ठोकले. यादरम्यान, आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्याने पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चेंडूला स्पर्शही करू शकला नाही. चेंडू पॅडला लागल्यावर चहलने जोरदार अपील केले. त्याचा विश्वास पाहून संजू सॅमसनने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.
रिप्लेमध्ये चेंडू पिचिंग इन लाइनमध्ये होता त्यामुळे अंपायर्स कॉल घेण्यात आला आणि चहलला विकेट मिळाली नाही. यामुळे तो थोडा निराश आणि रागावलेला दिसत होता. इकडे सूर्यकुमार यादवने लगेचच त्याला गाठले आणि मिठी मारली. हा मैत्रीपूर्ण क्षण कॅमेराच्या नजरेतून सुटला नाही.
दरम्यान, चहलने १५व्या षटकात सूर्यकुमारला बाद केले. पण तोपर्यंत मुंबई विजयाच्या जवळ आली होती. चहल हा टूर्नामेंटमधील सर्वात धोकादायक गोलंदाज म्हणून समोर आला आहे. त्याने नऊ सामन्यात १९ विकेट घेत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे.
सामन्यानंतर सूर्यकुमारने या घटनेबद्दल सांगितले की, “सामन्यादरम्यान मी चहलला काहीही सांगितले नाही आणि तो त्याच्या आणि माझ्यातील एक विनोदी प्रसंग होता. पण अंपायरच्या कॉलमुळे मी वाचलो याचा मला खरोखर आनंद आहे. चहल हा उत्तम गोलंदाज आहे आणि मी त्याच्यासोबतच्या या मजेदार लढतीचा खूप आनंद घेतला.”
मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि वाढदिवसाचा बॉय रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला १५८ धावांत रोखले. जोस बटलरने ६७ धावा केल्या. १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली. मुंबईने हा सामना पाच विकेटने जिंकला.