आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच लढती अटीतटीच्या होत आहेत. गुरुवारी झालेला चेन्नई आणि लखनऊ यांच्यातील सामना तर चांगलाच चुरशीचा झाला. या हंगामात काही संघ चांगली कामगिरी करत आहेत. तर काही संघांना एकही सामना जिंकता आलेला नाही. चेन्नई सुपर किंग्जचीही अशीच स्थिती झाली आहे. चेन्नईचा दोन्ही सामन्यांत पराभव झाला आहे. दरम्यान, चेन्नईचे नेतृत्व आणि मेहेंद्रसिंह धोनीची भूमिका यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भारताचे माकी क्रिकेटर अजय जडेजा आणि पार्थिव पटेल यानी धोनीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
लखनऊसोबतच्या सामन्यात नेमकं काय घडलं ?
गुरुवारी लखनऊ आणि चेन्नई यांच्यात लढत झाली. मात्र या समन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. धोनीने कर्णधारपदाचा त्याग केल्यामुळे चेन्नई संघाची जबाबदारी आता रविंद्र जाडेजावर आलेली आहे. धोनी लखनऊसोबतच्या सामन्यादरम्यान संघातील इतर खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसला होता. त्याच्या याच भूमिकेबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि अजय जाडेजा यांनी क्रिकबझ लाईव्हशी बोलताना नाराजी व्यक्त केलीय. ” धोनी हा मोठा खेळाडू आहे. मी त्याचा चाहता आहे. मात्र गुरुवारचा चेन्नईचा या लिगमधील दुसराच सामना होता. या हंगामातील शेवटचा सामना असता तर धोनीने संघाला मार्गदर्शन करणे योग्य होते. मात्र दुसराच सामना असताना धोनीने मार्गदर्शन करणे मला योग्य वाटले नाही,” अशा शब्दात अजय जाडेजाने आपली नाराजी व्यक्त केली.
जेव्हा चुका करेल तेव्हाच जाडेजा शिकेल
तसेच पार्थिव पटेलनेही या मताशी सहमती दर्शवली. धोनीने कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर जाडेजाला स्वातंत्र्य द्यायला हवे, असे मत पार्थिवने मांडले. “तुम्हाला जर नवे नेतृत्व निर्माण करायचे असेल तर त्याला स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. जाडेजाला नेतृत्व करण्याची संधी दिली तरच तो चांगला कर्णधार होऊ शकेल. तो जेव्हा चुका करेल तेव्हाच शिकेल,” असं पार्थिव पटेलने म्हटले.