आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अटीतटीच्या लढती होत आहेत. आज रविंद्र जाडेजा कर्णधार असलेला चेन्नई सुपर किंग्ज आणि मयंक अग्रवाल नेतृत्व करत असलेला पंजाब किंग्ज हे दोन संघ एकमेकांशी दोन हात करत आहेत. दरम्यान, फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर भानुका राजपक्षेदेखीलत धावबाद झाला. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना उडालेल्या गोंधळामुळे राजपक्षेचा बळी गेला.
राजपक्षे आणि धवन यांच्यात उडाला गोंधळ
फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. सलमीला आलेला पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात बाद झाला. झेलबाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी भानुका राजपक्षे मैदानात उतरला. फलंदाजीसाठी येताच भानुकाने आक्रमक खेळ करायला सुरुवात केली. त्याने मैदानात उतरताच एक षटकार लगावला. मात्र चेन्नईचा संघ १४ धावांवर असताना त्याने ख्रिस जॉर्डनच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र चेंडू थेट ख्रिस ज़ॉर्डनकडे गेल्यामुळे शिखर धवन आणि भानुका राजपक्षे गोंधळले. धावपट्टीवर अर्ध्यापर्यंत गेल्यानंतर धवन आणि राजपक्षे यांनी परत येण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत जॉर्डनने चेंडू धोनीकडे सोपवला होता. धोनीनेही वायुवेगाने हवेत झेप घेत चेंडू स्टंप्सला लावला. त्यामुळे राजपक्षेला तंबुत परतावे लागले.
भानुपक्षे पंजाबचा हुकमी एक्का आहे. मात्र तो पाच चेंडूंमध्ये फक्त ९ धावा करु शकल्यामुळे पंजाबसाठी हा मोठा धक्का समजला जातोय.