आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३८ व्या सामन्यात पंजाब किंग्जचा ११ धावांनी विजय झाला असून चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागलाय. अंबाती रायडूने शेवटपर्यंत संघर्ष करुनही चेन्नईला विजयापर्यंत पोहोचता आलं नाही. तर पंजाबचे शिखर धवन आणि ऋषी धवन या जोडीने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा >>> सामना पंजाबचा, पण चर्चा मात्र मालकिणीची; प्रीति झिंटाने वेधले सर्वांचे लक्ष

पंजाबने दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची धांदल उडाली. सलामीला आलेला रॉबिन उथप्पा अवघी एक धाव करून तंबुत परतला. तर ऋतुराज गायकवाडने ३० धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी आलेले मिचेल सँटनर (९) आणि शिवम दुबे (८) हे खेळाडू स्वस्तात बाद झाले. पहिल्या फळीतील फलंदाज लगेच बाद झाल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव वाढला.

हेही वाचा >>>PBKS vs CSK : पंजाबच्या गब्बरची धडाकेबाज खेळी, एकाच सामन्यात धवनने रचले दोन मोठे विक्रम !

मधल्या फळीतील अंबाती रायडने अर्धशतकी खेळी करत ३९ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या. रायडूने मोठी फटकेबाजी केल्यामुळे सामना चेन्नईकडे झुकला होता. मात्र तो बाद झाल्यानंतर सामन्याचे चित्र पुन्हा एकदा पालटले. फिनिशर म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंह धोनीदेखील आज आपली जादू दाखवू शकला नाही. त्याने १२ धावा केल्या. धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईच्या विजयाच्या आशा मावळल्या. तर पंजाब किंग्जचा ११ धावांनी विजय झाला.

हेही वाचा >>> PBKS vs CSK : पंजाबच्या गब्बरची धडाकेबाज खेळी, एकाच सामन्यात धवनने रचले दोन मोठे विक्रम !

यापूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर फलंदाजीसाठी आलेल्या पंजाब किंग्जने धडाकेबाज खेळी केली. सलामीला आलेला शिखर धवन शेवटपर्यंत मैदानात टिकून होता. त्याने ५९ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने ८८ धावा केल्या. तर धवनसोबत आलेला मयंक अग्रवाल फक्त १८ धवाकरु शकला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या भानुका राजपक्षे याने धवनला साथ देत ४२ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने १९ तर बेअरस्टोने ६ धावा केल्या. धवन आणि राजपक्षेच्या खेळीमुळे पंजाबने चेन्नईसमोर विजयासाठी १८८ धावांचे लक्ष्य ठेवले.

हेही वाचा >>> IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जसमोर नवं संकट, दिग्गज खेळाडू जखमी

गोलंदाजीबाबत बोलायचं झालं तर सहा वर्षांनंतर कमबॅक करुनही पंजाबच्या ऋषी धवनने धमाकेदार कामगिरी केली. त्याने भेदक मारा करत चेन्नईच्या दोन खेळाडूंना तंबुत पाठवलं. तसेच कसिगो रबाडानेही ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायडू या आघाडीच्या फंलादाजांना बाद करुन पंजाबसाठी विजय सुकर केला. संदीप शर्मा आणि अर्षदीप सिंग यांनी प्रत्येक एक विकेट घेत रबाडा आणि धवन यांना साथ दिली.

Story img Loader